Download App

Marathi Movie Baaplyok: सिनेमा पाहून घरी गेल्यावर आपल्या बाबांना घट्ट मिठी माराल… एवढं नक्की…

Marathi Movie Baaplyok: ‘बापल्योक’हा सिनेमा पाहिल्यावर तुमच्या काळजात गलबल्यासारखं होईल. गोष्ट अत्यंत साधी सोपी आणि सरळ आहे. रिंगण नंतर मकरंद ने पुन्हा एकदा बापाची आणि मुलाची गोष्ट अनोख्या पद्धतीने मांडली आहे. यामधला प्रवास आणि त्यामधून उमगत जाणारं… उमलत जाणारं… नातं अधोरेखित करणारा सिनेमा आहे. (Marathi Movie Baaplyok) म्हणावा तर थेट एक्सरे टाकणारा आणि म्हणावा तर तितकाच तरल पद्धतीने मकरंद माने (Makarand Mane) या गुणी दिग्दर्शकाने मांडला आहे. मकरंदच्या रिंगण ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता त्याचीही गोष्ट बाप आणि मुलाची होती.

एका नात्याच्या शोधाची तिथपर्यंत पोहोचणाऱ्या प्रवासाची हे त्यातून पूर्ण होणाऱ्या एका वर्तुळाची ही गोष्ट… बापल्योक मध्ये याचं आवर्तन आणि प्रतल दोन्ही बदलत जातं. दिग्दर्शक म्हणून मकरंद नात्यांमधील गहिरेपण दाखवताना कुठेही खोटा बेगडी सिरीयसनेस आणत नाही. हसत -खेळत खट्याळपणे… मिश्किलपणा जपत ही गोष्ट मांडतो. सिनेमाचं कथानक फिरत ते बाप आणि मुलाभोवती. मुलाचं लग्न ठरलं आहे आणि आता पत्रिका वाटायला मुलगा आणि बाप मुलाच्या बाईक वरून फिरत आहेत.

एकमेकांचे स्वभाव .‌.यामध्ये असणारं अंतर..‌ या प्रवासात एकमेकांना जाणून घेण्याचा झालेला प्रवास … हेकेखोर बाप आणि वल्ली मुलगा … जगण्याच्या अनुभवाच्या मुशीत तयार होत जात असताना व्यक्ती घडत जाते. सुरू असलेल्या प्रवासात त्याला आयुष्यात आलेले अनुभव… भेटलेली माणसं… यांच्याशी त्याच्या स्वभावाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नाळ जोडलेली असते. बाबांच्या आयुष्यातला हळवा कोपरा उलगडताना, आयुष्यभर हेवे-दाव्यांनी दुरावलेली नाती त्यातलं अंतर वाढत जात असताना… कुठे दोन पावलं मागे यावं आणि आपलं माणूस तुटू नये… यावर सिनेमा भाष्य करतं.


बापल्योकच्या सीन्सची केलेली आखणी त्याची ट्रीटमेंट यामधून मकरंद त्याचे अस्तित्व जाणवून देतो. बाप – मुलाच्या नात्यातील… भांडणातील… हेवे-दाव्यातील हलकेफुलकेपणा हा टॉम अँड जेरीच्या जातकुळीतला वाटता वाटता त्याचे रंग गडद करत जातो. शशांक शेंडे हा अतिशय गुणी, प्रतिभावान कलाकार आहे. काही सीन्स त्याने इतके उत्तम वठवले आहेत. बाप- मुलाची असणारी हमरी तुमरी, नाना मामाची भेट, तिने दूध देण्याचा असणारा फोन कट या सगळ्यात शशांकची देहबोली त्याची भाषा त्याचा लहेजा या सगळ्यातून त्यांनी उभं केलेल्या बाप मनात घर करतो.

ट्राफिक पोलीस सोबतचा सीन असेल किंवा हॉस्पिटल मधला बाहेर पडताना काही ठिकाणी चेहऱ्यावरची रेषही न हलवता तर काही ठिकाणी मोजकं माफकपणे व्यक्त होऊन भावनिक आंदोलनांची सीमारेषा नेमकेपणाने जोखलेली आहे आणि त्या पद्धतीने व्यक्त झालेला शशांक पाहणं ही एक व्हिज्युअल ट्रीट आहे.विठ्ठल काळे सारखा मुलगा अतिशय रांगडा रासवट मातीतला चेहरा वेगळ्या पद्धतीने छाप सोडतो. फिकट वाटणाऱ्या बापाचं अंतरंग प्रवासात उलगडत जाताना विठ्ठलच्या जाणिवांमध्ये झालेल्या बदल हा त्याने मुलाच्या रुपात नेमकेपणाने दाखवलेला आहे.

Baaplyok Movie: ‘बापल्योक’ चित्रपटाची टीम पोहोचली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी

शशांक समोर उभे राहताना किंबहुना काही सीन्स मध्ये विठ्ठल ही लक्षात राहतो ही जमेची बाब म्हणायला हवी. व्हिडिओ कॉल मधले फोन कट त्याचे प्रतिसाद… त्याच्या रिएक्शन्स… त्याला अधोरेखित करतात. नीता शेंडे यांनी साकारलेली आई अतिशय खरीखुरी वाटते. ट्रॅव्हल लॉग चित्रित करणे हे आव्हान… योगेश कोळीने इंटरेस्टिंग पद्धतीने चित्रित केलं आहे. मातीतल्या सिनेमात दिसणारा रांगडेपणासोबत अलवारपणा जपला आहे… अक्षय काकडे संकलन ही योग्य आणि समर्पक आहे. विजय गवंडेचं संगीत रंग भरतं. उमगाया बाप सारखं गाणं काळजात घर करतं. अजय गोगावलेच्या आवाजाची जादू आणि गुरूच्या शब्दांचं गारूड मनावर होतं… उत्तरार्धात सिनेमा पूर्वार्धापेक्षा गतिमान होतो. नागराज मंजुळेसारखं नाव प्रेझेण्टर असल्यामुळे या सिनेमाला उत्तम कोंदण लाभलं आहे.

विजय शिंदेंसारखा प्रयोगशील निर्माता खंबीरपणे मकरंद आणि शशांकच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला त्यामुळे अशा जाणिवसंपन्न कलाकृती निर्माण होतात… ही जमेची बाजू. रिंगण, व्हेंटिलेटर, जून, गोदावरी सारख्या या नव्या दमाच्या सिनेमांनी वडिलांसोबतचं नातं रुपेरी पडल्यावर वेगळ्या पद्धतीने अधोरेखित केले. बापल्योक यांच्या पंक्तीत बसला तरीही खट्याळ खोडकर आणि तरीही हळवा करून टाकणारा सिनेमा आहे. आपल्याकडे सिनेमातील नाती ही वेगळी खोटी अशी वाटतात काही तुरळक सिनेमांमध्येच माणसं हाडामासाची दिसतात बापलोक हा त्या हाडा मांसाच्या संतपणाने रसरसलेला सिनेमा आहे तेवढाच गोड…

का पाहावा – बाप मुलाचं नातं रंजक पद्धतीने मांडताना काळीज गलबलवून टाकतं.

का टाळावा – पूर्वार्ध थोडा थांबलाय

थोडक्यात काय – एकदा पाहायला हवा.

Tags

follow us