Movie Review | रेटिंग: ⭐⭐⭐(३/५)
घरी साधं झुरळ आलं तरी घाबरणारी आई आपल्या मुलावर संकट ओढवलं तर ते परतवून लावण्यासाठी कोणतही टोक गाठू शकते, याची अनेक उदाहरणं आपण पडद्यावर पाहिली आहेत, पण आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर क्राईम आणि डेटा चोरीच्या काळात आईसमोर उभं राहणारं संकट किती भयंकर असू शकतं, याचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘मर्दिनी’ करते. हा चित्रपट केवळ आई-मुलीच्या नात्याची भावनिक कहाणी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक विकृतीवर भाष्य करणारा एक थरारक सामाजिक ड्रामा आहे.
मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांनी निर्मिती केलेला हा चित्रपट दिग्दर्शक अजय मयेकर यांचा पहिला चित्रपट असला, तरी विषयाची मांडणी पाहता त्यांचा मालिकांमधील अनुभव स्पष्टपणे जाणवतो.
कथा
मुंबईतील एका चाळीत राहणारी अंजली घोरपडे (प्रार्थना बेहरे) ही आपल्या मुलगी ओवी (मायरा वैकुळ) आणि आईसोबत साधं, शांत आयुष्य जगत असते. तिचं संपूर्ण विश्व म्हणजे तिची मुलगी. मात्र एका अनपेक्षित घटनेनंतर तिचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर येतं. त्यानंतर सुरू होतो एका आईचा संघर्ष, सत्याचा शोध आणि आपल्या लेकराला वाचवण्यासाठीची जीवघेणी धडपड.
मध्यंतरा अगोदर या थरार पटाच्या मुख्य सूत्रधाराचा चेहरा दिग्दर्शक प्रेक्षकांसमोर उलगडतो. अशावेळी उत्तर अर्थ हा त्या गुन्ह्याचा तपास मागोवा आणि शोध या टप्प्यावर येऊन ठेपतो… तो उलगडा कसा कधी आणि किती रंजक आहे… त्याची ही कहाणी आहे…
दिग्दर्शन
अजय मयेकर यांनी संवेदनशील विषय हाताळताना अनावश्यक मेलोड्रामा टाळण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध अधिक घटनांनी भरलेला आहे…त्यामुळे तो पूर्वार्धापेक्षा अधिक नाट्यमय भासतो .
चित्रपटाचा सर्वात मोठा गुण म्हणजे तो कोणताही उपदेश न करता डिजिटल युगातील धोक्यांची जाणीव करून देतो. सोशल मीडिया, डेटा प्रायव्हसी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर गुन्हे यांसारख्या विषयांना कथेशी सहज जोडण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे.
मात्र तो जो गुन्हा करण्यासाठी इतका सतत मागवा घेतोय त्याचे कारण हे तितकेसे सबळ आणि समूळ हलवून टाकणारे नाही. त्यामुळे गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी का प्रवृत्त झाला याचा केलेला उलगडा हा तितकासा कथेला आणि त्या व्यक्तिरेखेला पूरक आणि संलग्न वाटत नाही…
अभिनय
प्रार्थना बेहरे हा चित्रपटाचा आत्मा आहे. एका सर्वसामान्य आईपासून संकटाशी दोन हात करणाऱ्या धाडसी स्त्रीपर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत प्रभावी ठरतो. तिच्या डोळ्यांतून व्यक्त होणारी भीती, असहाय्यता आणि नंतरचा निर्धार मनाला भिडतो.
अभिजित खांडकेकर आपल्या भूमिकेत प्रभावी ठरतो आणि कथेला आवश्यक असलेली तीव्रता देतो. त्याने साकारलेला सुर्वे इन्स्पेक्टर हा अधिक रंग भरतो. त्याची देहबोली आणि संवादफेक यामध्ये वेगळेपणा जाणवतो. जितेंद्र जोशी याच्या वाट्याला तुलनेने कमी प्रसंग आले असले तरी प्रत्येक दृश्यात तो आपली वेगळी छाप सोडतो.
छोट्या भूमिकेतही राजेश भोसले आपली छाप सोडतो.बालकलाकार मायरा वायकुळ निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्या आणि प्रार्थना बेहरे यांच्या भावनिक प्रसंगांमुळे चित्रपटाला हवी असलेली भावनिक उंची मिळते.
तांत्रिक बाजू
हितेश मोडक यांचं पार्श्वसंगीत अनेक प्रसंगांचा प्रभाव वाढवतं. शब्बीर नाईक यांची सिनेमॅटोग्राफी विशेषतः चाळीचं वास्तव आणि थरारक प्रसंग प्रभावीपणे टिपते. संवादही प्रसंगानुरूप आणि वास्तववादी आहेत.
मर्दिनी’ हा केवळ एका आईच्या संघर्षाचा चित्रपट नाही; तो प्रत्येक पालकासाठी एक इशाराही आहे. डिजिटल जगात आपल्या मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्याची किंमत किती मोठी असू शकते, याची जाणीव हा चित्रपट करून देतो.
व्यावसायिक मसाला चित्रपटांच्या गर्दीत सामाजिक आशय, भावनिक नातं आणि थरार यांचा समतोल साधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. काही त्रुटी असूनही ‘मर्दिनी’ प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न मनात ठेवून जातो…आपण खरंच डिजिटल जगात सुरक्षित आहोत का?
हा सिनेमा का पाहावा?
डिजिटल युगातील अत्यंत समकालीन आणि महत्त्वाचा विषय.
प्रार्थना बेहरेचा प्रभावी अभिनय.
आई-मुलीच्या नात्यातील भावनिक ताकद.
उत्तरार्धातील थरारचा चढता आलेख
सामाजिक संदेश आणि मनोरंजनाचा संतुलित मेळ.
का टाळावा?
गुन्हा करण्यासाठी इतका सतत मागवा घेतोय त्याचे कारण हे तितकेसे सबळ आणि समूळ हलवून टाकणारे नाही.
थोडक्यात काय?
सामाजिक आशय आणि मनोरंजनाचे रंजक समीकरण
‘मर्दिनी’ हा केवळ एका आईच्या संघर्षाचा चित्रपट नाही; तो प्रत्येक पालकासाठी एक इशाराही आहे. डिजिटल जगात आपल्या मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्याची किंमत किती मोठी असू शकते, याची जाणीव हा चित्रपट करून देतो.
व्यावसायिक मसाला चित्रपटांच्या गर्दीत सामाजिक आशय, भावनिक नातं आणि थरार यांचा समतोल साधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. काही त्रुटी असूनही ‘मर्दिनी’ प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न मनात ठेवून जातो…आपण खरंच डिजिटल जगात सुरक्षित आहोत का?
कलाकार :- जीतेंद्र जोशी, प्रार्थना बेहरे, अभिजीत खांडकेकर, राजेश भोसले, मायरा वायकुळ
दिग्दर्शक : अजय मयेकर
सिनेमॅटोग्राफर : शब्बीर नाईक
संगीत : हितेश मोडक
निर्मिती : अफ्लुएन्स मोशन पिक्चर्स,ओ डी आय ग्रूप श्रेयस तळपदे
