‘तेरा यार हूँ मैं’मधून अमन इंद्र कुमार आणि आकांक्षा शर्माला लॉन्च करताना मिळालेला सर्वात मोठा धडा; मिलाप झवेरी यांचा खुलासा

Tera Yaar Hoon Main: या चित्रपटातून अमन इंद्र कुमार मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. आकांक्षा शर्मा देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहे.

Tera Yaar Hoon Main

Tera Yaar Hoon Main

Tera Yaar Hoon Main: मास एंटरटेनर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरी ( Milap Milan Zaveri ) त्यांच्या आगामी ‘तेरा यार हूँ मैं’ (Tera Yaar Hoon Main:) या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. या चित्रपटातून अमन इंद्र कुमार मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. आकांक्षा शर्मा देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहे. हा बहुप्रतीक्षित कौटुंबिक मनोरंजनपट 24 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटामुळे अमन इंद्र कुमार (Aman Indra Kumar) आणि आकांक्षा शर्मा यांच्या कारकिर्दीची नवी सुरुवात होत असली, तरी दोन नवोदित कलाकारांना प्रेक्षकांसमोर सादर करण्याची जबाबदारी पार पाडताना दिग्दर्शक म्हणून स्वतःलाही मोठा अनुभव आणि शिकवण मिळाल्याचे मिलाप मिलन झवेरी यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येक चित्रपट तुम्हाला काहीतरी शिकवून जातो आणि ‘तेरा यार हूँ मैं’ने मला नवोदित कलाकारांना लॉन्च करण्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून दिली. अमन इंद्र कुमार आणि आकांक्षा शर्मा या दोघांचेही हे पदार्पण असल्याने त्यांच्या स्वप्नांची जबाबदारी काही प्रमाणात माझ्या खांद्यावर होती. ते दोघेही प्रचंड प्रतिभावान होते, पण त्यांच्यासोबत असुरक्षितता आणि अनेक अपेक्षाही होत्या. दिग्दर्शक म्हणून तुम्ही फक्त चित्रपट तयार करत नाही, तर त्यांच्या प्रवासाचाही एक भाग बनता आणि प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारावे, अशी मनापासून इच्छा बाळगता.”

ते पुढे म्हणाले,”माझ्यासाठी सर्वात मोठा धडा म्हणजे हे समजणे की तुम्ही आता फक्त स्वतःसाठी काम करत नाही. तुम्ही एखाद्याच्या कारकिर्दीची सुरुवात घडवण्याची जबाबदारीही सांभाळत असता. ही जाणीव तुम्हाला अधिक मेहनत करण्यास भाग पाडते, कारण तुम्ही केवळ तुमची दृष्टी साकारत नसता, तर दोन नवोदित कलाकारांना सर्वोत्तम सुरुवात मिळावी यासाठीही प्रयत्न करत असता.”

या चित्रपटात परेश रावल, जॉनी लिव्हर, सुप्रिया पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, नेहा खान, पूजा कातुर्डे, आनंद आचार्य आणि दर्शन जरीवाला यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश असून, प्रत्येक कलाकार आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने या भावनिक आणि कौटुंबिक कथेला अधिक समृद्ध करणार आहे.

अजय मुर्डिया प्रस्तुत आणि मुंबई फिल्म्स, BIK प्रॉडक्शन्स तसेच Enter10 Television यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती अजय मुर्डिया, बीना इंद्र कुमार आणि मनीष सिंघल यांनी केली असून, सुभाष काळे हे सहनिर्माते आहेत. कॅमेरा टेक फिल्म्स निर्मित ‘तेरा यार हूँ मैं’ हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version