Minister Tatkare inaugurated the ‘Krantijyoti Vidyalaya-Marathi Medium’, which emphasizes the importance of education in the mother tongue: मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिक्षणातील बदल, मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग उपस्थित होते.
ईडीनंतर सीबीआयचा दणका! अनिल अंबानींशी संबंधित सहा ठिकाणी CBI चा छापा; काय मिळालं?
यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या, ”आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत शाळेचे मोठे योगदान असते. मातृभाषेतून होणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर खोलवर परिणाम करणारे आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटातून समाजाला योग्य संदेश मिळेल आणि तो विचार करायला लावणारा ठरेल. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त होत असल्याचा मला विशेष अभिमान आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे आशयसंपन्न चित्रपट सादर करत असतात. त्यांचा हा नवीन चित्रपटही नक्कीच मनाला स्पर्श करणारा ठरेल.”
रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका; ‘या’ दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ‘कढीपत्ता’
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ”आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल. मुहूर्ताला मा. आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.” क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटात नेमके कोण कोण कलाकार झळकणार आहेत याबाबत मात्र अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.