Mohammed Rafi Birth Anniversary : आपल्या सुरमई आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिवंगत गायक मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांचा आज जन्मदिवस. ते आज जरी हयात नसले तरी त्यांचे बहारदार गाणे आजही लोकांच्या ओठांवर रेंगाळत आहेत. रफी साहेबांनी प्रेम, दुःख, सुख, देशभक्ती, भजन, बालगीत अशाप्रकारे जवळपास सगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये आपला आवाज आजमावला होता.
एकवेळ अशी आली होती जेव्हा त्यांनी त्यांच्या करिअरच्या पिक पॉईंटवर मौलवींच्या सांगण्यावरून गाणं सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण मोहम्मद रफी यांनी हज यात्रा केली होती. त्यानंतर काही मौलवींनी त्यांना सांगितलं होतं की, तुम्ही आता हाजी झाले आहात. त्यामुळे तुम्हाला गाणे आणि कार्यक्रम करणे बंद करावे लागेल. त्यांनाही त्यांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी गाणं सोडलं.
मात्र ही गोष्ट जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये लोकांना कळाली. तेव्हा मोठा गोंधळ झाला पण त्यांना समजून सांगितल्यानंतर मोहम्मद रफींनी पुन्हा गायला सुरुवात केली. रफी साहेबांनी हिंदीमध्ये 26 हजारहून अधिक गाणे गायले आहेत. त्यांचे प्रत्येक गाणं हे खास आहे. तसेच प्रत्येक गाण्याच्या मागे एक किस्सा देखील आहे. असाच एक किस्सा आहे ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील गाण्याचा. कारण हे गाणं गाताना त्यांच्या गळ्यातून अक्षरशः रक्त येत होतं.
हा किस्सा म्युझिक डायरेक्टर ‘नौशाद’ यांनी त्यांच्या बायोग्राफी ‘नौशादनामा : द लाईफ अँड म्युझिक ऑफ नौशाद’ यामध्ये सांगितलं. ते म्हणतात ‘बैजू बावरा’ या चित्रपटातील ‘ओ दुनिया के रखवाले’ हे गाणं लोकांना प्रचंड आवडलं. मात्र मोहम्मद रफी यांनी हे गाणं गाण्यासाठी अक्षरशः रक्त सांडल आहे.
कारण हे गाणं गायला अत्यंत कठीण होतं. त्यासाठी तासन् तास रियाज करावा लागत होता. गाण्याची स्केल उंच असल्याने रियाज आणि त्यानंतर रेकॉर्डिंग या दरम्यान मोहम्मद रफी यांच्या गळ्यातून अक्षरशः रक्त येत होतं. मात्र त्यांनी कोणतीही तक्रार न करता हे गाणं पूर्ण केलं. त्यानंतर अनेक दिवस त्यांना कोणतेही गाणं गाता येत नव्हतं.