Mukkam Post Devach Ghar Movie : आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या (Movie) चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून उपस्थित होते. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं. मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या कथानकाची मांडणी अतिशय हलक्याफुलक्या, रंजक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरमधून समजतं आहे. श्रवणीय संगीताचीही जोड या कथानकाला असून “सुंदर परिवानी” ह्या गोड़ गीताला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
एखादी चांगली कलाकृती तुम्ही केल्यावर नक्कीच त्यामागे अनेकजण पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्याचप्रमाणेच मंगेश ही या कलाकृतीच्या मागे प्रस्तुतकर्ता म्हणून उभा राहिला.चित्रपटाचा ट्रेलर मला खुप आवडला. दिग्दर्शक संकेतने या चित्रपटाची मांडणी उत्तम केली असल्याचे ट्रेलर मधून दिसून येते आहे. मायराने या चित्रपटात साकारलेली प्रमुख भूमिका उल्लेखनीय असल्याचे ट्रेलर मधून जाणवते आहे. तिने यात सातत्य ठेऊन अनेक उत्तम भूमिका साकारुन मनोरंजन विश्वात अजुन नाव कामवावे यासाठी माझे तिला अनेक आशीर्वाद असल्याचे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.
‘इलू इलू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, एली अवराम मराठी चित्रपटात करणार पदार्पण
मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची ही पहिलीच निर्मिति आहे तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे.
या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे छायाचित्रण रोहन मडकईकर यांनी केले असून गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीताना चिनार महेश यांचे श्रवणीय संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर याचे असून कार्यकारी निर्माता म्हणून अतुल साळवे यांनी काम पाहिले आहे.