Multi-distributor strategy for ‘Toxic: A Fairy Tale for Grown-Ups’ : तामिळनाडूच्या चित्रपट व्यापार क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण ठरावा अशी मोठी घडामोड घडली आहे. रॉकिंग स्टार यश यांच्या बहुचर्चित टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन -अप्स या चित्रपटाच्या तामिळनाडू वितरण हक्कांचा तब्बल 63 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स कमिशन बेसिसवर करार निश्चित झाला आहे. अलीकडच्या काळातील या प्रादेशिक बाजारातील हा सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक मानला जात असून, चित्रपटाविषयी असलेल्या प्रचंड अपेक्षांची ही साक्ष मानली जाते.
तामिळनाडूतील प्रदर्शनासाठी मल्टी-डिस्ट्रिब्युटर धोरण आखण्यात आले असून, राज्यभर मजबूत आणि व्यापक पोहोच सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे. चेन्नई सिटीचा भाग थिंक स्टुडिओज (स्वरूप रेड्डी) हाताळणार आहे, तर चेंगलपट्टू विभाग व्हाईट नाईट्स (ट्रायडंट रवी) कडे सोपवण्यात आला आहे. कोयंबतूर, नॉर्थ आणि साउथ आर्कोट, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी हे विभाग एस पिक्चर्स श्रीनिवासन यांच्या देखरेखीखाली असतील. मदुराई व रामनाड, त्रिची व तंजावूर तसेच सालेम या महत्त्वाच्या सर्किट्सची जबाबदारी 5 स्टार सेंथिल यांच्याकडे देण्यात आली आहे. या सुनियोजित वितरण पद्धतीमुळे सिंगल स्क्रीनपासून मल्टिप्लेक्स साखळ्यांपर्यंत राज्यभर प्रभावी प्रदर्शन सुनिश्चित केले जाणार आहे.
या सहकार्यासंदर्भात तामिळनाडूतील वितरण भागीदारांनी उत्साह व्यक्त करत म्हटले की, टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन -अप्स हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक प्रतीक्षित भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. तामिळनाडूमध्ये आधीपासूनच या चित्रपटाला आणि यशला प्रचंड प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांनी यशला ज्या प्रकारे आपलेसे केले आहे, ते खरोखर विशेष आहे. एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा वितरण भागीदार होणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा केवळ मोठा रिलीज नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतीक्षित प्रकल्पाशी जोडले जाण्याचा आनंददायी क्षण आहे.”
अजित पवार अपघात प्रकरणात CID ची एंट्री; DGCA ची VSR वर कारवाई; CID तपासात नवे पुरावे समोर
व्यापार विश्लेषकांच्या मते, या प्रचंड व्यवहारामागे केजीएफ: चॅप्टर 2 च्या अभूतपूर्व यशाचा मोठा वाटा आहे. त्या चित्रपटानंतर तामिळनाडूमध्ये यश यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्यांच्या दमदार पडद्यावरील उपस्थितीला आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वाला तामिळ प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सीमारेषा ओलांडणारी ही लोकप्रियता आता बॉक्स ऑफिसवरील विश्वासात रूपांतरित होताना दिसत आहे.
63 कोटींचा अॅडव्हान्स करार आणि मजबूत प्रादेशिक वितरण नेटवर्कच्या जोरावर टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन -अप्स तामिळनाडूमध्ये भव्य ओपनिंगसाठी सज्ज झाला आहे. राज्यातील हा आगामी काळातील सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा चित्रपट गितु मोहनदास यांनी दिग्दर्शित केला असून, कथा लेखनात यश आणि गीतू मोहनदास यांचा सहभाग आहे. चित्रपट कन्नड आणि इंग्रजी भाषेत एकाचवेळी चित्रीत करण्यात आला असून हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळमसह इतर भाषांमध्ये डब आवृत्त्या प्रदर्शित होणार आहेत. केव्हीएन प्रोडक्शन्स आणि मॉन्स्टर माईंड क्रिएशन्स यांच्या निर्मितीतील हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारीया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
