अजित पवार अपघात प्रकरणात CID ची एंट्री; DGCA ची VSR वर कारवाई; CID तपासात नवे पुरावे समोर
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, विविध अंगांनी चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली.
CID’s entry in Ajit Pawar accident case : बारामतीत 28 जानेवारी रोजी घडलेल्या विमान अपघातप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूचा तपस अधिक व्यापक करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, विविध अंगांनी चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली.
प्राथमिक टप्प्यात पुणे पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू होता. मात्र, या प्रकरणाची संवेदनशीलता आणि गंभीर स्वरूप पाहता कलाम 194अंतर्गत तपस सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. या आकस्मिक मृत्यूमागे कोणताही घातपात आहे का, याची सखोल चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर क्रिमिनल निग्लीजन्स म्हणजेच निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, याचा देखील तपास सुरू आहे. तसेच हा कोणताही गुन्हेगारी कट तर नाही ना,या दृष्टीने देखील सर्व शक्यता पडताळून पहिल्या जात आहेत.
तपास प्रक्रियेत अनेक संस्था सहभागी झाल्या आहेत. फॉरेन्सिक लॅब आणि इतर तांत्रिक संस्थांकडून पुरावे तपासले जात असून, त्यांचे अहवाल सीआयडीच्या तपासात समाविष्ट करण्यात येणार आहेत. आतापर्यंत अनेक महत्वाचे पुरावे समोर आले असून, अजून देखील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सर्व पुरावे आणि तांत्रिक अहवालांचा अभ्यास केल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करा; रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
दरम्यान, या अपघातप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थातच डीजीसीएकडून व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्यात आ;याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता, सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, तांत्रिक तपास हा स्वतंत्र भाग आहे आणि सीआयडीचा तपास हा आकस्मिक मृत्यूच्या कारणांवर केंद्रित आहे. दोन्ही तपासाच्या निष्कर्षांचा परस्पर संदर्भ घेतला जाईल. याबरोबरच विमान अपघात तपास यंत्रणा एएआयबीचा अहवाल आल्यानंतर तो देखील सीआयडीच्या तपासात समाविष्ट केला जाणार आहे. एएआयबीचा अंतिम निर्णय आणि निष्कर्ष आल्यानंतरच पूढील कायदेशीर भूमिका स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी देखील पत्र देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, तपासासाठी कोणतीही ठराविक टाइमलाईन देण्यात आलेली नाही. तपास योग्य दिशेने सुरू असून, गुन्हेगारी कृत्य आढळल्यास गुन्हा दाखल करून न्यायालयात जाण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
एकूणच बारामती विमान अपघातप्रकरणी घातपात, निष्काळजीपणा किंवा गुन्हेगारी कट अशा सर्व शक्यतांचा बारकाईने तपास सुरू असून, संबंधित सर्व संस्थांचे अहवाल आणि पुरावे एकत्रित करूनच अंतिम निष्कर्ष जाहीर करण्यात येणार आहे.
