Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. आलियाच्या घरातून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला होता. पोस्ट शेअर करत तिने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) टॅग केलं होतं. आता पोलिसांनी आलियाशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.
आलियाची पोस्ट काय आहे? (Alia Bhatt Post)
आलियाने संताप व्यक्त करत लिहिलं आहे, “मी घरातील लिव्हिंग रुममध्ये (Living room) बसले होते. त्यावेळी कोणीतरी मला पाहतयं असं मला जाणवलं. मी खिडकीत येऊन पाहिल्यानंतर मला कळलं की, समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन फोटाग्राफर माझे फोटो काढत आहेत. एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणं किती योग्य आहे ? मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.
आलियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पोस्ट शेअर करत तिने मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं आहे. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आलिया भट्टशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितलं आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘खार पोलिसांनी आलिया भट्टशी संपर्क साधला आहे. तसेच तिला सांगितलं आहे की, फोटोग्राफरविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस याप्रकरणाची चौकशी करतील.
आलियाच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहते देखील आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. आलियाची पीआर टीम आता फोटोग्राफरच्या शोधात आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी म्हटलं आहे, “लवकरच पोलिसांनी त्या फोटोग्राफरवर कारवाई करावी”. अर्जुन कपूरने लिहिलं आहे की, “हे खूप लज्जास्पद आहे. सामान्य असो किंवा नामांकित आज महिला त्यांच्याच घरात सुरक्षित नाहीत. ही गंभीर बाब समोर आली आहे.