Nirdhar Film Shooting in Kolhapur : मराठी सिनेसृष्टीला (Marathi Movie) सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचंही काम केलं आहे. याच पठडीतील ‘निर्धार’ (Nirdhar) या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘निर्धार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच कोल्हापूरमध्ये करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ कलादिग्दर्शक सतीश बिडकर यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला.
निर्मात्या पद्मजा वालावलकर या जयलक्ष्मी क्रिएशनच्या बॅनरखाली ‘निर्धार’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिलीप भोपळे असून, लेखन दिनानाथ वालावलकर यांनी केलं (Entertainment News) आहे. कोल्हापूर आणि आसपासच्या विविध ठिकाणी ‘निर्धार’चं चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे. या चित्रपटाद्वारे भ्रष्ट समाजव्यवस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यापासून सामान्य जनतेस भोगावे लागणारे दुःख, या विरोधात कोणीतरी रणशिंग फुंकण्याची गरज आहे. ‘निर्धार’ चित्रपटात हे काम तरुण पिढी करताना दिसणार आहे.
शरद पवारांचा आशीर्वाद, गेमचेंजर मुद्दे हातात; कलाटेंना ‘चिंचवड’मध्ये दिसतेय परिवर्तनाची लाट..
भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करत समाजापुढे नवा आदर्श ठेवणाऱ्या तरुण पिढीची कथा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक दिलीप भोपळे म्हणाले की, ‘निर्धार’ चित्रपटात प्रेक्षकांना समाजातील वास्तव दिसणार आहे. हा चित्रपट केवळ उपदेशाचे डोस पाजण्याचं काम करणार नसून, खऱ्या अर्थाने मनोरंजन आणि प्रबोधनाची सांगड घालणारा असल्याचे दिलीप भोपळे यांनी सांगितले. कोल्हापूरमधील रिअल लोकेशन्सवर चित्रीकरण करताना खऱ्या अर्थाने चित्रपटाच्या कथानकाला न्याय देण्याचं काम सुरू असल्याचं यावेळी बोलताना निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी! वडगाव शेरीत महायुतीला खिंडार, रेखा टिंगरेंसह अनेक भाजप कार्यकर्ते पवारांच्या पक्षात
‘निर्धार’मध्ये डॅा. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अथर्व पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, महेंद्र पाटील, कोमल रणदिवे, आदी कलाकार अभिनय करत आहेत. कला दिग्दर्शनाचं काम विकी बिडकर पाहात असून, डिओपी अतुल सुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी करत आहेत. अतुल शिधये रंगभूषा करत असून, प्रशांत पारकर यांनी वेशभूषाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर असून क्रिएटिव्ह प्रोड्यूसर महेंद्र पाटील आहेत. संतोष जाधव सहदिग्दर्शक असून राहुल पाटील प्रमुख सहाय्य्क दिग्दर्शक आहेत. निर्मिती व्यवस्थापक कैलास भालेराव असून अजय खाडे लाईन प्रोड्युसर आहेत.