मुंबई : आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त महिलांवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा होणे म्हणजे चांगला योग. पण या चित्रपटाची घोषणा थेट सचिन तेंडुलकरने करणे हे त्याहून मोठा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की कोणत्या चित्रपटाची घोषणा झाली आहे.’बाईपण भारी देवा’ असं या चित्रपटाचं नाव आहे.
खुद्द सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मिडीयावर या चित्रपटच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे. सचिनने त्याच्या अकाउंटवर लिहिले की, ‘आई, बहीण, बायको, मुलगी अशा रुपांत स्त्रीत्व साजरे करत सतत जिंकणाऱ्या स्त्रीचा सन्मान व्हायला व्हावा असे मला नेहमी वाटते. तिचे आयुष्य किती भारी असते हे मी अनुभवले आहे. आणि आता तुम्हीही ते अनुभवू शकता, 30 जूनला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पाहताना… खूप शुभेच्छा !’ अशा शब्दांत सचिनने या चित्रपटच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर करत चित्रपटाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
आई, बहीण, बायको, मुलगी अशा रुपांत स्त्रीत्व साजरे करत सतत जिंकणाऱ्या स्त्रीचा सन्मान व्हायला हवा असे मला नेहमी वाटते.
तिचे आयुष्य किती भारी असते हे मी अनुभवले आहे.
३० जूनला तुम्हीही ते खात्रीने अनुभवू शकता “बाईपण भारी देवा” हा चित्रपट पाहताना…
१/२
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 8, 2023
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर ही अशा सहा बहिणींची गोष्ट आहे ज्यात प्रेम, माया, तडजोड, जिद्द, ध्येय, दुःख, स्वार्थ अशा अनेक भावनांचा खजिना आहे. स्त्रीच्या वेगवेगळ्या छटा, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, आणि तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध करता करता, “थांब, जरा श्वास घे” म्हणत तिच्या कौशल्याला दाद देणारी ही कहाणी आहे. या सहा जणी जेव्हा नाईलाजास्तव म्हणा एकत्र येतात तेंव्हा त्यांच्याही नकळत त्यांच्या भूतकाळावर आणि वैयक्तिक संघर्षांवर मात करत असताना त्यांच्या मनाची, भावनांची होणारी घालमेल, उडणारा गोंधळ यांचा मजेदार प्रवास यात घडताना दिसतो.
Women’s Day : शाकुंतलमच्या निर्मात्यांनी दिल्या महिला दिनाच्या अनोख्या शुभेच्छा !
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, माधुरी भोसले निर्मित, बेला शिंदे आणि अजित भुरे सह-निर्मित, आणि केदार शिंदे द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या अभिनयनाने नटलेला ‘बाईपण भारी देवा’ ही विनोदी – कौटुंबिक कथा आहे. हा चित्रपट येत्या 30 जून 2023 ला प्रदर्शित होणार आहे.