एक बापट चर्चेत, दुसरा रंगभूमीवर हसवायला सज्ज, भरत जाधव यांची साथ, ‘गेला बापट कुणीकडे’ची धमाल

नावात साधर्म्य असलं, तरी विषयात मात्र पूर्ण वेगळेपण असलेल्या या नाटकातून प्रेक्षकांना हास्याची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

Untitled Design   2026 11 23T171232.372

Untitled Design 2026 11 23T171232.372

One Bapat in the spotlight, another set to bring laughter to the stage : सध्या प्रसारमाध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत ‘बापट’ हे नाव वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. डीजेचा दणदणाट असो, ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा असो किंवा त्यावरून व्हायरल होणारे मीम्स… ‘बापट’ हे नाव चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. याच चर्चेत आता रंगभूमीवरही एका ‘बापटां’ची भर पडणार आहे. पण थांबा! या बापटांचा सध्याच्या बातम्यांशी, कोणत्याही वादाशी किंवा चर्चेतल्या व्यक्तींशी काहीही संबंध नाही. कारण हा आहे राम बापट! एका साध्या, सरळ माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या भन्नाट गोंधळाची गोष्ट सांगणारं नवं विनोदी नाटक म्हणजे ‘गेला बापट कुणीकडे..’

नावात साधर्म्य असलं, तरी विषयात मात्र पूर्ण वेगळेपण असलेल्या या नाटकातून प्रेक्षकांना हास्याची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. राम बापटांच्या आयुष्यात नेमकं असं काय घडतं, की सगळ्यांनाच प्रश्न पडतो, ‘गेला बापट कुणीकडे..’ याचं उत्तर शोधताना रंगणारा गोंधळ, घडणारे विनोदी प्रसंग आणि त्यातून निर्माण होणारी धमाल प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. हास्य, गोंधळ आणि नात्यांची भन्नाट गुंतागुंत उलगडणारं ‘गेला बापट कुणीकडे’ हे धमाल विनोदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली.

‘भरत जाधव एंटरटेनमेंट्स’ प्रस्तुत आणि ‘ब्रह्मांडनायक पिक्चर्स’ निर्मित ‘गेला बापट कुणीकडे’ नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन आणि गीत लेखन राजेश देशपांडे यांनी केलं आहे. नाटकाची निर्मिती हार्दिक मोगावीरा आणि सहनिर्मिती राम राणे यांची आहे. मिलिंद फाटक आणि पूर्णिमा तळवळकर यांच्यासह शार्दूल सराफ, गौरी सुखटणकर, पालवी कदम, चिंतन लांबे, राम राणे आणि विजय मिरगे हे कलाकार आपल्या दमदार अभिनयातून या धमाल गोष्टीला रंगत आणणार आहेत सध्याच्या चर्चेतल्या बापटांपेक्षा रंगभूमीवरचा हा बापट नक्कीच वेगळा ठरणार आहे. खुसखुशीत संवाद, भन्नाट प्रसंग आणि गैरसमजांची गुंतागुंत यांतून प्रेक्षकांना हसवण्याची जबाबदारी या बापटांनी घेतली आहे!

मोठी बातमी! पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब असल्याची चर्चा; न्यायालय परिसर तातडीनं रिकामा

अभिनेते आणि या नाटकाचे प्रस्तुतकर्ते भरत जाधव म्हणाले, “चांगली कलाकृती केवळ निर्माण होऊन चालत नाही, तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिला मोठं करण्याची जबाबदारीही आपली असते. दर्जेदार कलाकृतीला योग्य पाठबळ मिळालं, तर ती अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचू शकते. या नाटकाचे मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग व्हावेत, प्रत्येक शहरात आणि गावात ते रसिकांपर्यंत पोहोचावं, ही माझी मनापासून इच्छा आहे. या नाटकाच्या यशस्वी आणि व्यापक प्रवासासाठी माझे आशीर्वाद तर आहेतच, पण गरज पडेल तिथे माझा सक्रिय पाठिंबाही कायम असेल!”

लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे म्हणाले, “ ‘बापट’ या नाटकाची कथा मला कोरोना काळात सुचली. मात्र, नाटकाचे नाव सध्या चर्चेत असलेल्या ‘बापट’ प्रकरणा’वरून सुचले आहे. नावातील या मिश्कीलपणामुळे नाटकाबद्दल उत्सुकता निर्माण होते; मात्र नाटकाची कथा पूर्णपणे वेगळी आणि रंजक आहे. लेखक म्हणून कथेशी मनापासून जोडला गेलो, तर प्रेक्षकही तिच्याशी जोडले जातात, असा माझा विश्वास आहे. भरत जाधव यांची साथ, निर्मात्यांचा विश्वास आणि संपूर्ण टीमच्या पाठबळामुळे हे नाटक साकार झाले. नावातील मिश्कीलपणा आणि भन्नाट विनोदातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

अभिनेते मिलिंद फाटक म्हणाले, “ ‘गेला बापट कुणीकडे’ हे नावच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं आहे! या नाटकाच्या निमित्ताने दगडाचं सोनं व्हावं, तसाच काहीसा अनुभव येतोय. भरत जाधव आणि राजेश देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा आनंद वेगळाच आहे. भरत जाधव हे नाव जिथे असतं, तिथे हाऊसफुल्लचा बोर्ड लागण्याची परंपराच आहे. त्यामुळे हे नाटकही रसिकांच्या पसंतीस उतरून हाऊसफुल्ल होईल, असा मला ठाम विश्वास आहे!

सोनं घसणार की, पुन्हा आकाशाला भिडणार?; अमेरिकेतील तीन तारखांकडे सगळ्यांच्या नजरा

अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर म्हणाल्या, “मी पहिल्यांदाच विनोदी नाटकात काम करत आहे आणि या निमित्ताने खूप काही शिकायला मिळत आहे. मुळात राजेशचं लेखन इतकं सशक्त आहे की त्यातून विनोद आपसूकच निर्माण होतो. त्यामुळे विनोदनिर्मितीसाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. असं दर्जेदार लेखन असलेल्या नाटकाचा भाग होता येणं, ही माझ्यासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे!”

संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी तुषार देवल यांनी सांभाळली असून, प्रकाशयोजनेतून शीतल तळपदे यांची आहे. वेशभूषा महेश शेरला यांची तर रंगभूषा उदय तांगडी यांची आहे. गोट्या सावंत यांचे सूत्रधार आहेत. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आणि अनुदीप जाधव यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे.

‘गेला बापट कुणीकडे’ नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग डिसेंबर महिन्यात पुणे आणि मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहेत.या नाटकाचा पहिला प्रयोग 5 डिसेंबर रोजी, शनिवारी दुपारी 12:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे रंगणार आहे. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी, रविवारी सायंकाळी 5 वाजता विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर येथे प्रयोग होईल. मुंबईत 13 डिसेंबर रोजी, रविवारी रात्री 8:30 वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, मुलुंड येथे, तर 15 डिसेंबर रोजी, मंगळवारी दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे नाटकाचे प्रयोग रंगणार आहेत.

Exit mobile version