Patri Sarkar 1942 : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश सत्तेला समांतर शासन चालवून हादरा देणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्यावर आधारित आगामी बहुचर्चित ‘पत्री सरकार १९४२’ या चित्रपटाचा अधिकृत टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देणाऱ्या ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांची शौर्यगाथा या टीझरमधून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. अंगावर शहारे आणणारा हा टीझर असल्याचं समोर येत आहे. “दीडशे वर्ष पारतंत्र्यात खितपत पडलेल्या जनतेच्या नसानसांत पुन्हा स्वातंत्र्याची ज्योत प्रखर होऊ लागलेली आहे…” या दमदार संवादाने सुरू होणारा हा टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.
ब्रिटीशांविरोधातील जनतेचा असंतोष, नाना पाटलांच्या ‘पत्री सरकार’ची धगधगती चळवळ आणि क्रांतीकारकांचा संघर्ष याचे थरारक दृश्य टीझरमध्ये पाहायला मिळते. भागीरथी मोशन पिक्चर्स (Bhaagirathi Motion Pictures) ची निर्मिती असलेला हा सिनेमा विशाल गोविंदराव जाधव निर्मित आहे. तर चित्रपटाचे लेखन, संगीत व दिग्दर्शन मनिष अनसुरकर यांचे आहे.
१९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनानंतर सातारा जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले समांतर सरकार (पत्री सरकार) हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत क्रांतिकारी अध्याय मानला जातो. जुलमी राजवटीला धडा शिकवणारे हे पत्री सरकार आणि त्यात योगदान देणारे अनेक अज्ञात क्रांतीकारक यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच इतक्या भव्य स्वरूपात मांडण्यात येत आहे.
बारामतीत जोरदार पाऊस, 158 मिमी पावसाची नोंद; शाळांना सुट्टी जाहीर-
चित्रपटाचा अधिकृत टीझर सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबरपासून जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
