मुंबई : प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यातील दुवा म्हणजे नाट्य परिषद. या परिषदेची पंचवार्षिक निवडणूक यंदा होत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने यंदा दोन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ‘रंगकर्मी नाटक समूह’आणि ‘आपलं पॅनल’ यांच्यात ही टक्कर पाहायला मिळणार आहे. ज्यात अभिनेते प्रशांत दामले हे ‘रंगकर्मी नाटक समूह’पॅनलचे प्रतिनिधित्व करत आहेत तर ‘आपलं पॅनल’हे निर्माते प्रसाद कांबळी यांच्या प्रतिनिधित्वात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेव्हा नाट्यसृष्टीच्या सक्षमीकरणासाठी हे दोन्ही पॅनल सध्या निवडणुकांसाठी सज्ज आहेत.
‘रंगकर्मी नाटक समूह’पॅनलमध्ये नाट्यसृष्टीचा प्रदीर्घ अनुभव असणारे रंगकर्मी या पॅनलचे उमेदवार आहेत. ज्यात मध्यवर्ती शाखेत प्रशांत दामले, विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, दिलीप जाधव, सुशांत शेलार, सविता मालपेकर, विजय सूर्यवंशी हे उमेदवार आहेत. तर बोरीवली शाखेसाठी नितीन नेरुरकर, उदय राजशिर्के, संजय देसाई, हेमंद बिडवे हे उमेदवार आहेत.
तर नाटक ज्यांचा प्राण आहे अशा रंगकर्मींचे स्वतःचे प्रतिनिधित्व करणारे ‘सच्चे रंगकर्मी कार्यकर्ते’ ‘आपल पॅनल” मधून २०२३ ते २०२८ या वर्षांसाठी पंचवार्षिक निवडणूक लढवीत आहॆत. लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, रंगमंच कामगार, व्यवस्थापक, कलाकार, निर्माते या सर्वांना या पॅनलमधून प्रतिनिधित्व देण्यात आले असून ते एकत्रितपणे पुन्हा उभे आहेत.
आपलं पॅनल मध्ये मुंबई (मध्यवर्ती) उमेदवारांमध्ये नवनाथ (प्रसाद) कांबळी, सुकन्या कुलकर्णी–मोने, मंगेश कदम, राजन भिसे, प्रमोद पवार, संतोष काणेकर, रत्नकांत जगताप, सुनील देवळेकर, अनिल कदम, प्रभाकर वारसे हे उमेदवार आहेत. तर मुंबई उपनगर उमेदवारांमध्ये दिगंबर प्रभू, अविनाश नारकर, अशोक नारकर, ऐश्वर्या नारकर हे उमेदवार आहेत.
‘रंगकर्मी नाटक समूहाने त्यांची उद्दिष्ट आणि कार्यही नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत. ज्यात चांगली आणि व्यावसायिक नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत निर्मात्यांना पाठिंबा देणे, नाटक व्यवसाय मोठा होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणे, महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या अवस्थेविषयी आढावा घेऊन सुधारणांच्या दृष्टीने पाऊल उचलणे, प्रायोगिक नाटकांना राज्यस्तरावर सपोर्ट सिस्टम उभी करणे, गावोगावी सभासद योजना राबवून त्याअंतर्गत नाटक व्यवसायाचे ४ प्रमुख घटक निर्माता, कलाकार, बॅकस्टेज आणि प्रेक्षक आहेत. या सर्वांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्यासाठी पुढाकार, नाट्यसंकुल पुन्हा उभारण्याचा प्रयत्न, नाट्यसंमेलनात नाविन्य आणणे ही आणि इतर महत्त्वाची उद्दिष्टे आणि कार्यांचा त्यात समावेश आहे.
तर आपलं पॅनलने मागील २०१८ – २३ या पंचवार्षिक काळात परिषदेच्या माध्यमातून केलेली कामे, त्यांची कोरोना काळातील कार्य यांचा तपशीलही जाहीर केलाय. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून शासन, नगरविकास खात्याच्या अखत्यारीतील सर्व नाटयगृहांचे अद्ययावतीकरण करणे, महाराष्ट्रातील कार्यरत व्यावसायिक नाट्य संस्थांसाठी प्रत्येकी ५ लाखांचे आणि कार्यरत हौशी नाट्य संस्थासाठी प्रत्येकी २ लाखांचे अनुदान मिळण्यासाठी प्रयत्नशील ही आणि इतर महत्त्वाची उद्दिष्टे आणि कार्य मांडली आहेत.
Salman Khan: सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा
येत्या १६ एप्रिल रोजी नाट्यपरिषद निवडणूक मतदान पार पडणार आहे. ज्या मुंबई आणि उपनगरातून प्रत्येकी 14 तर महाराष्ट्रातून 80 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. सध्या दोन्ही पॅनल कार्य आणि उद्दिष्टे समोर मांडून मते मागत आहेत. तेव्हा या निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या रंगकर्मींपैकी कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं असेल.