Download App

आता चित्रपट पायरसीला बसणार आळा; कठोर तरतुदी असलेलं सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक मंजुर

  • Written By: Last Updated:

Cinematograph amedment  Act  : चित्रपट उद्योगाला ( film industry) मदत करण्यासाठी, चित्रपटांच्या पायरसीला (Piracy) आळा घालण्यासाठी आणि परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक दुरुस्ती विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सिनेमॅटोग्राफ कायदा, 1952 मध्ये (Cinematograph Act, 1952) सुधारणा करणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. आता या विधेयकामुळे चित्रपटांच्या पायरसीला आळा घालण्यास मदत होणार आहे. (Rajyasabha passes Cinematograph amedment  Act bill with stringent provisions to curb film piracy)

या विधेयकात सरकारने चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी बनवणाऱ्यांना जास्तीत जास्त तीन वर्षांचा तुरुंगवास आणि चित्रपटाच्या निर्मिती खर्चाच्या पाच टक्के दंडाची तरतूद केली आहे.

CBFC ला नवीन अधिकार मिळाले
सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक-2023 मध्ये 10 वर्षांचा वैधता कालावधी काढून टाकून कायमस्वरूपी वैधता असलेल्या चित्रपटांना प्रमाणपत्रे देण्यास सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) परवानगी देण्यात आली. याशिवाय, विधेयकात ‘UA’ श्रेणी अंतर्गत तीन वयो-आधारित प्रमाणपत्रे सादर करण्याची तरतूद आहे, म्हणजे आतापर्यंत सिनेमांना मुख्य चार गटात विभागले जायचे. ए, यु, यु/ए अशी श्रेणीत प्रमाणपत्र देण्यात यायचं. आता प्रमाणपत्रांच्या यादीत भर पडली. 7 हून अधिक वर्षाच्या मुलांसाठी, 13 हून अधिक वयोगटातील मुलांसाठी आणि 16 हून अधिक वयाच्या मुलांसाठी असे तीन गट तयार केले. थोडक्यात ‘UA 7+’, ‘UA 13+’ आणि ‘UA 16+’असे प्रमाणपत्र गट असणार आहेत. यासोबतच CBFC ला टेलिव्हिजन किंवा इतर माध्यमांवर त्याच्या प्रदर्शनासाठी वेगळ्या प्रमाणपत्रासह चित्रपट मंजूर करण्याचा अधिकार देण्यात आला.

विधेयकात नवीन कलमांचा समावेश
चित्रपट पायरसीला आळा घालण्यासाठी, विधेयकात सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये नवीन कलमांचा समावेश करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. ज्यामध्ये चित्रपटांच्या अनधिकृत रेकॉर्डिंग (कलम 6AA) आणि त्यांचे प्रदर्शन (कलम 6AB) प्रतिबंधित करण्याची तरतूद आहे.

अनुराग ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला
कॅबिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारताव्यतिरिक्त जगभरातील कलाकारांसाठी पायरसी हे मोठे आव्हान आहे. उत्कृष्ट कंटेट तयार करण्यासाठी एक मोठी टीम लागते. दुर्दैवाने अनेक वेळा पायरसीमुळे त्यांची मेहनत वाया जाते. यामुळे चित्रपटसृष्टीचे करोडोंचे नुकसान होते. पायरसीमुळे चित्रपटसृष्टीला होणारे 20,000 कोटी रुपयांचे नुकसान दूर करण्यासाठी सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक आणण्यात आले आहे.

Tags

follow us