Rakshabandhan Special: Adi Shravani’s Special Bonding : भांडणं, मस्ती, एकमेकांची खेचणं आणि गरजेच्या वेळी खंबीर साथ… भाऊ-बहीणीचं नातंच असं खास असतं! कधी खट्याळ, कधी हळवं, तर कधी शब्दांपलीकडचं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहीणीच्या या खास नात्याचा उत्सव साजरा होत ‘द्विधा’चित्रपटामधून भाऊ-बहीणीच्या याच नात्यातील प्रेम, आपुलकी आणि भावनिक गुंफण उलगडणार आहे.
‘द्विधा’मध्ये अभिनेता निमिष कुलकर्णी आदित्य (आदि), तर अभिनेत्री मानसी कुलकर्णी श्रावणीच्या भूमिकेत असून, दोघेही चित्रपटात आत्येभाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. बालपणापासून एकत्र वाढलेल्या आदि आणि श्रावणीच्या नात्यातील जिव्हाळा, विश्वास, मस्ती आणि असंख्य गोड आठवणींची सुंदर वीण या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
सत्तेची, राजकारणाची आणि अस्तित्वाच्या संघर्षाची खडतर कहाणी; “ घामासान“ चा ट्रेलर केला प्रदर्शित !
मिश्कील संवाद, मजेशीर नोकझोक आणि हळव्या क्षणांतून हे नातं प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणार आहे. विशेष म्हणजे, निमिष आणि मानसी यांनी ऑफस्क्रीनही एकत्र खूप धमाल केली असून, त्यांच्यातील ही सहज, मनमोकळी आणि आपुलकीची केमिस्ट्री पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. कौटुंबिक नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा, मस्ती आणि भावनांची सुंदर गुंफण अनुभवण्यासाठी ४ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा ‘द्विधा’ चित्रपट नक्की पाहा!
