इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जी यांचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

राणी यांच्या अभिनय कारकिर्दीचा आणि जगभरातील प्रेक्षकांशी त्यांनी निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा या विशेष गौरवातून सन्मान करण्यात आला.

Untitled Design (56)

Untitled Design (56)

Rani Mukherjee honored : राणी मुखर्जी यांना इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) येथे अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अविस्मरणीय व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या राणी यांच्या अभिनय कारकिर्दीचा आणि जगभरातील प्रेक्षकांशी त्यांनी निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा या विशेष गौरवातून सन्मान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक असलेल्या राणी मुखर्जी यांनी विविध प्रकारच्या चित्रपटांमधून तसेच हिंदी सिनेमातील अनेक संस्मरणीय महिला व्यक्तिरेखांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रूढींना आव्हान देणाऱ्या महिलांपासून ते प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सामर्थ्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तिरेखांपर्यंत, राणी यांच्या अभिनयात भावनिक खोली, आत्मविश्वास आणि प्रेक्षकांशी सहज जोडले जाण्याची क्षमता सातत्याने दिसून आली आहे. ब्लैक,हम तुम , युवा , बंटी और बबली , नो वन किल्ड जेसिका , हिचकी , मर्दानी फ्रँचायझी आणि मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे यांसारख्या चित्रपटांमधून त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय वैविध्य आणि उत्क्रांती दिसून येते. त्याचबरोबर, मानवी भावनांशी जोडलेल्या कथा प्रभावीपणे मांडण्याची त्यांची खासियत कायम राहिली आहे.

IFFM मधील हा सन्मान राणी यांच्या केवळ प्रदीर्घ कारकिर्दीचाच नव्हे, तर त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या जागतिक प्रवासाचाही गौरव करतो. गेल्या तीन दशकांत त्यांच्या चित्रपटांनी भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडत जगभरातील प्रेक्षकांपर्यंत प्रवास केला आहे आणि भारताशी निगडित कथांमध्ये जगभरातील प्रेक्षकांना स्वतःच्या भावनांचे प्रतिबिंब दिसले आहे. या सन्मानाबद्दल राणी मुखर्जी म्हणाल्या,”जेव्हा मी एक तरुण मुलगी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हा एक दिवस माझे चित्रपट आणि मला साकारण्याची संधी मिळालेल्या व्यक्तिरेखा मला समुद्रापार घेऊन जातील आणि ऑस्ट्रेलियासारख्या सुंदर देशातील लोक मला इतक्या प्रेमाने स्वीकारतील, याची मी कधीच कल्पना केली नव्हती.

चीनमधील ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा भारताच्या मान्सूनवर परिणाम? पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

जगभरातील लोकांचे माझ्या सिनेमातून मनोरंजन करणे ही या व्यवसायाने मला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. ऑस्ट्रेलियाने नेहमीच मला आणि भारतीय सिनेमाला खुले मनाने स्वीकारले आहे. कथा सांगण्याच्या माध्यमातून विविध संस्कृती एकत्र येतात असे हे ठिकाण बनले आहे. चित्रपट आपल्याला आठवण करून देतात की भावनांना पासपोर्टची गरज नसते आणि प्रेम, हास्य व आशा ही आपल्या सर्वांना समजणारी भाषा आहे.” त्या पुढे म्हणाल्या,”अभिनेता म्हणून आम्ही कॅमेऱ्यासमोर अभिनय करतो. पण तो अभिनय जेव्हा एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहोचतो, तेव्हाच खरी कथा सुरू होते. गेल्या तीन दशकांपासून माझे चित्रपट, माझ्या व्यक्तिरेखा आणि माझा आवाज घरापासून इतक्या दूरपर्यंत पोहोचला आणि तरीही लोकांच्या आयुष्यात त्यांना स्थान मिळाले, हे जाणून घेणे माझ्यासाठी अत्यंत नम्र करणारे आहे.

मला अशा महिलांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले ज्या मनमोकळेपणाने हसल्या, मनापासून प्रेम केले, निर्भयपणे लढल्या आणि स्वतःवरचा विश्वास कधीच गमावला नाही. एका अर्थाने प्रत्येक व्यक्तिरेखेने मला थोडेफार बदलले आहे. त्यांनी मला एक चांगली अभिनेत्री बनवले आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे एक चांगली माणूस बनवले.” IFFM सोबतचा राणी यांचा हा सन्मान भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रभावाचा आणि सांस्कृतिक पोहोचचा उत्सव साजरा करणाऱ्या महोत्सवाच्या भूमिकेलाही अधोरेखित करतो. IFFM 2026 चे आयोजन 13 ते 23 ऑगस्टदरम्यान होत असून, देशभरातील भारतीय चित्रपट आणि चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणत भारतीय कथाकथनातील वैविध्य आणि त्याचा जागतिक प्रभाव साजरा केला जात आहे.

राणी मुखर्जी यांच्या तीन दशकांच्या शानदार कारकिर्दीतील हा सन्मान विशेष महत्त्वाचा आहे. या काळात त्यांनी सातत्याने स्वतःला नव्याने साकारत भारतीय सिनेमातील काही सर्वाधिक प्रभावशाली आणि दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या महिला व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तीन दशकांनंतरही त्यांचा अभिनय विविध पिढ्या आणि भौगोलिक सीमा ओलांडत प्रेक्षकांशी जोडला जात आहे—एक महान अभिनेत्री आणि ती निवडत असलेल्या प्रभावी कथांच्या कालातीत शक्तीची हीच खरी पावती आहे.

Exit mobile version