Release dates of the films announced : प्रादेशिक चित्रपटसृष्टीबद्दलची आपली बांधिलकी अधिक दृढ करत पॅनोरमा स्टुडिओजने कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्ससोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करण्यात येणार आहे. ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’ हे ते दोन चित्रपट आहेत.
दोन्ही चित्रपटांचे मुख्य चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या ते पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहेत. लवकरच या चित्रपटांच्या प्रमोशनल प्रक्रियेला सुरुवात होणार असून, सप्टेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीत त्यांचे चित्रपटगृहात प्रदर्शन नियोजित आहे. या भागीदारीमुळे पॅनोरमा स्टुडिओजच्या प्रादेशिक चित्रपटांच्या यादीत आणखी दोन महत्त्वपूर्ण चित्रपटांची भर पडली आहे. भारतातील आघाडीच्या चित्रपट स्टुडिओसोबत कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्ससारख्या नव्या दमाच्या सर्जनशील संस्थांचा हा सहयोग असून, दमदार आशय आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या अस्सल मराठी कथांना बळ देण्याचा या भागीदारीचा उद्देश आहे.
या चित्रपटांच्या यादीत आघाडीवर आहे ‘तुझ्या आयला’. सुजय डहाके दिग्दर्शित हा भावनिकदृष्ट्या प्रभावी चित्रपट असून, पॅनोरमा स्टुडिओजचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी; कल्ट डिजिटलचे सुनील जैन, आदित्य जोशी आणि मोहित अरोरा; तसेच प्रकाश फिल्म्सचे राजेश सिंह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मेघना प्रमाणीकर सहनिर्मित या चित्रपटात राजश्री देशपांडे, संभाजी भगत आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Chakan Issue : उद्योगांचे स्थलांतर नव्हे, पुण्याच्या प्रगतीला सुरुंग; ‘चाकण’चा पट्टा महत्त्वाचा का?
‘रक्तफळ’ हा या भागीदारीतील दुसरा चित्रपट आहे. आधुनिक तरुणाईच्या भावनिक विरोधाभासांचा वेध घेणारा हा समकालीन, युवा-केंद्रित ‘मॅड फँटसी-कॉमेडी-थ्रिलर’ आहे. उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर, गौरी नलावडे, केतकी कुलकर्णी, कोटा फॅक्टरी फेम मयूर मोरे आणि प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. गोव्यातील वेलनेस टुरिझम, नाइटलाइफ आणि वर्गीय महत्त्वाकांक्षा यांच्या रंगतदार, पण एकाकी करणाऱ्या पार्श्वभूमीवर ‘रक्तफळ’ची कथा आकार घेते. सुजय डहाके दिग्दर्शित या चित्रपटाचे गोव्यातील 40 दिवसांचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, ‘रक्तफळ’ फेब्रुवारी–मार्च 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटांना दर्जेदार आणि प्रभावी कथाकथनाच्या माध्यमातून अधिक व्यापक व्यावसायिक व्याप्ती मिळवून देण्याच्या सामायिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब या भागीदारीतून दिसून येते.
पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठक म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीवर आणि तिच्याकडून सादर होणाऱ्या असंख्य अप्रतिम कथा व प्रतिभेवर आमचा कायमच ठाम विश्वास राहिला आहे. यापूर्वीही मराठी चित्रपटांसोबत केलेले आमचे सहकार्य सर्जनशीलदृष्ट्या तसेच त्यांना मिळालेल्या सन्मानाच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक ठरले आहे. ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’च्या माध्यमातून कल्ट डिजिटल, प्रकाश फिल्म्स आणि सुजय डहाके यांच्यासोबत हा प्रवास पुढे नेताना आम्हाला आनंद होत आहे. मराठी संस्कृतीच्या मुळाशी जोडलेल्या, मात्र देशभरातील प्रेक्षकांशी संवाद साधण्याची क्षमता असलेल्या नव्या कथांना पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या भागीदारीबद्दल दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले, “सिनेमा म्हणजे भावनिकदृष्ट्या प्रामाणिक, सामाजिकदृष्ट्या संबंधित आणि सर्जनशीलदृष्ट्या निर्भीड कथा सांगण्याचे माध्यम आहे. या भागीदारीतील प्रत्येक भागीदार अस्सल कथाकथनाच्या ताकदीवर विश्वास ठेवतो, हीच गोष्ट मला सर्वाधिक उत्साहित करते. ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’च्या माध्यमातून आम्ही दोन अत्यंत वेगवेगळ्या विश्वांचा शोध घेतला आहे. पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या एकत्रित पाठबळातून हे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”
राजकीय चर्चांना उधाण; राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड बैठक
कल्ट डिजिटलचे संस्थापक सुनील जैन आणि आदित्य जोशी तसेच प्रकाश फिल्म्सचे राजेश सिंह म्हणाले, “पॅनोरमा स्टुडिओजसोबतची ही भागीदारी आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. संस्कृतीच्या मुळाशी जोडलेले आणि समकालीन प्रेक्षकांशी संवाद साधणारे चित्रपट निर्माण करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कटिबद्ध आहोत. ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’ हे मराठी चित्रपटसृष्टीतील बदलती महत्त्वाकांक्षा आणि सर्जनशील क्षमता अधोरेखित करतील, असा आम्हाला विश्वास आहे. या भागीदारीला दीर्घकालीन स्वरूप देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
दोन्ही चित्रपटांचे निर्मितीचे काम पूर्ण झाले असून, पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्यातील व्यापक धोरणात्मक सहकार्याची ही सुरुवात असल्याचे या भागीदारीतून स्पष्ट होते. राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची क्षमता असलेल्या दर्जेदार प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मितीवर या सहकार्याचा भर असेल. दोन्ही चित्रपटांच्या मार्केटिंग प्लॅन आणि प्रदर्शनाच्या रणनीतीबाबत पुढील घोषणा लवकरच करण्यात येणार आहेत.
