राजकीय चर्चांना उधाण; राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड बैठक
राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
Raj Thackeray met Chief Minister Fadnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत कोकणातील प्रलंबित विकासकामे, विशेषतः मुंबई-गोवा महामार्गाची रखडलेली कामे, तसेच मुंबईतील शिवाजी पार्क मैदानासंदर्भातील काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला आहे. 9 ऑगस्ट रोजी त्यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव बायपास परिसराला भेट देत महामार्गाच्या रखडलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत प्रकल्पाच्या विलंबामागील कारणांवरही भाष्य केले होते.
पाहणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी महामार्गाच्या कामात झालेल्या विलंबासाठी राजकीय हस्तक्षेप आणि व्यवस्थेतील त्रुटींना जबाबदार धरले होते. विकासकामे वेळेत पूर्ण करण्याऐवजी काही जणांना त्यातून आर्थिक फायदा कसा मिळेल यालाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे कोकणातील नागरिकांना गेली अनेक वर्षे अपूर्ण रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
टाटा समूहात महत्त्वाची घडामोड; एन. चंद्रशेखरन अध्यक्षपदावरून पायउतार, एस. पद्मनाभन यांची नियुक्ती
मुंबई-गोवा महामार्गाचे काम तब्बल 17 वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले असल्याची टीका करत राज ठाकरे यांनी कोकणवासीयांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. माणगाव बायपासचे अपूर्ण काम हा या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोकणातील जमीन, पाणी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत असताना स्थानिकांना मात्र अपेक्षित विकास मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
गेली अनेक वर्षे कोकणातील नागरिक त्याच समस्यांना सामोरे जात आहेत. तेच खड्डे, तीच वाहतूक कोंडी, तेच रखडलेले रस्ते आणि निवडणुकीत पुन्हा त्याच प्रश्नांवर आश्वासने दिली जातात. नोकरी, पाणी आणि रस्ते हेच मुद्दे वर्षानुवर्षे कायम आहेत, असे म्हणत त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला होता. सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केले असते तर हा प्रकल्प इतकी वर्षे रखडला नसता, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे. मुंबई-गोवा महामार्गासह कोकणातील पायाभूत सुविधा, विकासकामांची गती आणि अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. मात्र बैठकीनंतर दोन्ही नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसल्याने या चर्चेचे नेमके स्वरूप काय होते, याबाबत उत्सुकता कायम आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा राजीनामा, देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहात मोठा बदल