शेतकऱ्यांना घाबरता तर दौरे रद्द करा…मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा

मुख्यमंत्री ज्या भागात पाहणीसाठी जात आहेत, तिथं बॅरिकेड्स आणि मेटल डिटेक्टर लावण्यात येत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 23T171559.648

Rohit Pawar targets the Chief Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त भागाचा दौरा नेमका कशासाठी करत आहेत, हाच प्रश्न आम्हाला पडला असल्याचे सांगत त्यांनी दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री ज्या भागात पाहणीसाठी जात आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स आणि मेटल डिटेक्टर लावण्यात येत असल्याचा दावा करत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली.

दुष्काळामुळे शेतकरी आधीच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधणार असतील, तर शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुरावा कमी झाला पाहिजे. मात्र प्रत्यक्षात मोठी सुरक्षा व्यवस्था उभारून हा दुरावा आणखी वाढवला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी जात आहेत, तिथे मेटल डिटेक्टर लावण्याची गरज काय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांनी त्यांच्याशेतामध्ये बॉम्ब लावून ठेवले आहेत का? ते अधिकाऱ्यांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर फेकणार आहेत का? असा खोचक सवाल करत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर टीका केली.

तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपाआधी सरकारचा मोठा निर्णय, रविवारीही बँका राहणार खुल्या

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातील पीक गेले आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात काम नसल्यामुळे शेतमजुरांचाही रोजगार हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ पाहणी दौरे करण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यावर भर द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

तुम्हाला सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांची एवढी भीती वाटत असेल तर असे दौरे करण्याची गरजच काय? दौरे रद्द करा, कार्यालयात बसा आणि शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करा, अशा शब्दांत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये, तर शेतमजुरांच्या कुटुंबांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत रोहित पवार यांनी यापूर्वीही मराठवाड्यातील विविध भागांना भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने तातडीने मदत करावी, पीक विम्याची रक्कम मिळावी आणि चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात विनाकारण बॅरिकेड्स आणि मेटल डिटेक्टरची व्यवस्था करून शेतकरी आणि सरकार यांच्यामधील अंतर आणखी वाढवू नका, असेही रोहित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना सध्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रदर्शन किंवा केवळ पाहणी दौरे नको आहेत, तर त्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस आर्थिक निर्णय घ्यावेत, अशी मागणी करत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जोरदार टीका केली.

follow us