टाटा समूहात महत्त्वाची घडामोड; एन. चंद्रशेखरन अध्यक्षपदावरून पायउतार, एस. पद्मनाभन यांची नियुक्ती

एन. चंद्रशेखरन हे टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (36)

N. Chandrasekaran steps down as Chairman : टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा केमिकल्समध्ये मोठा नेतृत्वबदल झाला आहे. कंपनीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी कंपनीचे विद्यमान संचालक एस. पद्मनाभन यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलामुळे उद्योगविश्वात चर्चा रंगली असून टाटा समूहाच्या विविध कंपन्यांमधील नेतृत्व संरचनेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

एन. चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. 2017 मध्ये त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर समूहातील विविध जबाबदाऱ्यांमध्ये चंद्रशेखरन यांची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे.

राजीनाम्यानंतर चंद्रशेखरन यांनी टाटा केमिकल्सच्या संचालक मंडळाला पत्र लिहून आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्याकडे सध्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असून आगामी काळातही विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करायचे आहे. त्यामुळे टाटा केमिकल्सच्या अध्यक्षपदासाठी आवश्यक वेळ देता येणार नसल्याने त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

आरोग्य सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आयुर्वेदिक औषध क्षेत्रातील 10 कंपन्यांवर एफडीएकडून कायमस्वरूपी बंदी

चंद्रशेखरन हे नोव्हेंबर 2020 मध्ये टाटा केमिकल्सच्या संचालक मंडळात सामील झाले होते. त्यांच्याकडे कंपनीचे सुमारे 9 कोटी रुपयांचे समभाग असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कंपनीने टाटा सन्सचे धोरण प्रमुख मोदन साहा यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे मानले जात आहे.

कंपनी कायद्यानुसार एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 20 कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्य करू शकते. यामध्ये खाजगी, सार्वजनिक, सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्यांचा समावेश असतो. त्यापैकी केवळ 10 सार्वजनिक कंपन्यांच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून राहता येते, तर कमाल 7 सूचीबद्ध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करता येते.

आमच्या कंपनीच्या उत्पादनावर परिणाम होतोय; रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे उद्योजक चाकणमधल्या कंपन्या हलविणार?

टाटा समूहात सध्या अनेक महत्त्वाचे बदल घडत आहेत. टाटा मोटर्सच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू असून कंपनी दोन स्वतंत्र भागांमध्ये विभागली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखरन यांच्यावर समूहातील विविध कंपन्यांच्या नेतृत्वाची आणि धोरणात्मक निर्णयांची अधिक जबाबदारी येणार आहे. याशिवाय त्यांची नुकतीच रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा समूहातील कंपन्यांमधील रतन टाटा यांच्या समभागांचे व्यवस्थापन आणि त्यातून मिळणाऱ्या लाभांचे नियोजन या फाउंडेशनमार्फत केले जाते. या समभागांची किंमत सुमारे 2,750 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

एन. चंद्रशेखरन यांच्या कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी 1987 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कंपनीत विविध पदांवर काम करत 2007 मध्ये टीसीएसच्या संचालक मंडळात स्थान मिळवले आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या दिशेने वाटचाल केली. 2009 मध्ये ते टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आणि त्यानंतर त्यांनी कंपनीला जागतिक स्तरावर मोठी झेप मिळवून दिली. पुढे 2017 मध्ये त्यांच्याकडे टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.

टाटा केमिकल्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा केवळ नेतृत्वबदल नसून समूहातील वाढत्या जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला धोरणात्मक निर्णय मानला जात आहे.

follow us