आरोग्य सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आयुर्वेदिक औषध क्षेत्रातील 10 कंपन्यांवर एफडीएकडून कायमस्वरूपी बंदी

तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरातील 434 परवानाधारक आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली होती.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (32)

Ayurvedic medicine manufacturing companies permanently cancelled :  राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभारावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत तब्बल 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 तसेच ‘शेड्युल टी’ अंतर्गत असलेल्या ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस’च्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरातील 434 परवानाधारक आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान कारखान्यांची स्वच्छता, तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, औषध चाचणी नोंदी, मानक कार्यपद्धती आणि उत्पादनांच्या लेबल्सची सखोल पडताळणी करण्यात आली.

तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याने 135 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. तर गंभीर उल्लंघन करणाऱ्या 10 संस्थांचे परवाने थेट रद्द करण्यात आले आहेत.

‘अधिकाररूपी तलवार डास मारण्यासाठी वापरता का?’; कॅडिला प्रकरणात हायकोर्टाचे FDA वर ताशेरे

परवाने कायमस्वरूपी रद्द झालेल्या संस्थांमध्ये बारामती येथील कृष्णा हर्बल, करंजा (गोंदिया) येथील लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स, वडेगाव (तिरोडा) येथील आदित्य फार्मा आणि अंगरस आयुर्वेद, पुण्यातील कालिदास गांधी, सिन्नर येथील शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी, जेजुरी एमआयडीसी येथील इंडुकेअर फार्मा प्रा. लि., अमरावतीतील हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर, गोंदियातील हिलॅरियस आयुर्वेद आणि नाशिक रोड येथील यशोदा लॅब प्रा. लि. यांचा समावेश आहे.

एफडीएच्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही ठिकाणी मान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी अनुपस्थित असतानाही औषधांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. अनेक संस्थांकडे गुणवत्ता नियंत्रण विभागच नव्हता, तर औषधांच्या चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीचीही कमतरता होती. काही कारखान्यांमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू होते, तसेच औषधांच्या लेबलवर चुकीच्या उत्पादन तारखा छापल्याचेही निदर्शनास आले.

याशिवाय कच्च्या आणि तयार मालाच्या चाचण्यांचे अभिलेख, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध नव्हती. विविध औषधांचे घटक एकमेकांत मिसळू नयेत यासाठी आवश्यक कार्यपद्धतीच नसल्याने भेसळीचा धोका निर्माण होत असल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि उत्पादन मानकांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही औषध उत्पादकाची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे राज्यातील आयुर्वेदिक औषध उद्योगात खळबळ उडाली असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचा संदेश प्रशासनाने दिला आहे.

follow us