नारेगावातील फ्लॅटवर पोलिसांचा छापा; TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक

निदा खानवर कथित धर्मांतर घडवून आणण्यासाठी मदत करणे, तसेच अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपींना सहकार्य केल्याचे गंभीर आरोप आहेत.

Untitled Design 91

Absconding accused Nida Khan arrested : नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीशी संबंधित लैंगिक अत्याचार आणि कथित बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात आता मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर तिचा शोध सुरू होता. अखेर छत्रपती संभाजीनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आलं असून, या कारवाईमुळे संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान ही 25 मार्चपासून फरार होती. नाशिक पोलिसांच्या दोन विशेष पथकांकडून तिचा सातत्याने शोध घेतला जात होता.

दरम्यान, ती सतत ठिकाण बदलत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. पोलिसांच्या रडारवर असलेल्या निदा खानने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत अखेर तिचा ठावठिकाणा शोधून काढला. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये निदा खान लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिस आणि नाशिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने संबंधित फ्लॅटवर छापा टाकला.

त्या वेळी निदा खान आपल्या आई-वडील, भाऊ आणि मावशीसह त्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतलं आणि पुढील चौकशीसाठी नाशिकला रवाना केलं. अटकेनंतर रात्री उशिरा तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणात निदा खानवर धार्मिक भावना दुखावणे, कथित धर्मांतर घडवून आणण्यासाठी मदत करणे, तसेच अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपींना सहकार्य केल्याचे गंभीर आरोप आहेत. तपास यंत्रणांच्या मते, धर्मांतराच्या कथित साखळीत तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

त्यामुळे तिच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील इतर दुवेही समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी दानिश शेख याच्या मोबाईल तपासणीतूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. SIT कडून करण्यात आलेल्या डिजिटल फॉरेन्सिक तपासात मोबाईलमध्ये अनेक संशयास्पद फोटो आणि व्हिडिओ आढळून आले आहेत. या व्हिडिओंमध्ये नेमकं काय आहे, त्यांचा संबंध कोणाशी आहे आणि त्यातून आणखी कोणाची नावं समोर येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. तपास यंत्रणा आता या डिजिटल पुराव्यांचं सखोल विश्लेषण करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या मोबाईलमधील काही सामग्री अत्यंत संवेदनशील असून, त्यातून या प्रकरणाचं जाळं अधिक मोठं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासादरम्यान काही नवीन व्यक्तींची नावं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे SIT आणि नाशिक पोलिस या प्रकरणात अधिक सतर्क झाले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं असून, निदा खानच्या चौकशीतून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us