501 वादकांचा सामूहिक शंखनाद ! नाशिकमध्ये नवा जागतिक विक्रम

Nashik-रविवारी सायंकाळी 501 गोदासेवकांनी एकाचवेळी शंखनाद केल्याने गोदाकाठ दुमदुमून गेला.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Nashik

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (KumbhMela) ध्वजारोहणाचा मंगलक्षण जवळ येत असताना नाशिकमध्ये गोदातीरावर 501 शंखांचा निनाद घुमला. कोजागरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर देवमामलेदार पटांगणाजवळ झालेल्या सामूहिक शंखनादातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात आला आहे. 303 जणांनी एकाच वेळी शंखनाद केल्याची नोंद असलेला विक्रम मागे टाकला आहे. 31 ऑक्टोबरला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणावेळीही ह्यातले 251 शंखवादक ध्वजारोहणाच्या नेमक्या क्षणी शंखनाद करणार आहे.

रविवारी सायंकाळी 501 गोदासेवकांनी एकाचवेळी शंखनाद केल्याने गोदाकाठ दुमदुमून गेला. सलग साडेपाच मिनिटे शंखनाद करण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला. यासाठी चेन्नईहून खास 501 सर्टिफाइड शंख मागविण्यात आले आहे. या शंखनादाची विशेष धूनही तयार करण्यात आली होती. या जागतिक विक्रमाची नोंद घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे 12 सदस्यांचे पथक उपस्थित होते.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण व गुणगौरव न्यास संचालित अनंत विजय शंखनाद पथक ह्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. भारतीय धार्मिक परंपरेत शुभकार्याच्या प्रारंभी शंखनाद करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणापूर्वी होणारा हा सामूहिक शंखनाद सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. प्राचीन परंपरेचा जागर करण्यासोबतच नाशिकच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह हेही यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी सात वाजता गोदा आरती झाली. त्यामुळे सामूहिक शंखनाद आणि गोदा आरतीच्या माध्यमातून गोदातीरावर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाला आहे.

follow us