अशोक खरात प्रकरणावरून चंद्रकांत पाटील अडचणीत? रवींद्र धंगेकरांचा फडणवीसांना थेट सवाल, कारवाईची मागणी

खरातचे पाय धरतानाचे फोटो समोर आल्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुद्द्यावरून रवींद्र धंगेकर यांनी भाजपला घेरलं आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 23T152455.403

Ravindra Dhangekar’s direct question to Fadnavis : भोंदू अधिक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. या प्रकरणात महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या अशोक खरातविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असतानाच आता राजकीय नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. खरातसोबत काही राजकीय नेत्यांचे फोटो समोर आल्यानंतर यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. मात्र, खरातचे पाय धरतानाचे फोटो समोर आल्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा मुद्दा उपस्थित करत शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपला घेरलं आहे.

अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर खरातशी संबंधित अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि संबंध चर्चेत आले होते. खरातच्या संस्थेशी रुपाली चाकणकर यांचे कनेक्शन समोर आल्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खरातसाठी छत्री धरल्याचे मुद्द्यावरून देखील त्यांच्यावर टीका झाली होती. दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांचे देखील खरातचे पाय धरतानाचे फोटो समोर आले होते. मात्र, या दोन्ही प्रकरणांमध्ये वेगवेगळे निकष लावले जात असल्याचा आरोप आता केला जात आहे. याच मुद्द्यावरून रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत चंद्रकांत पाटील यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुरतहून परतलो तेव्हा जाणीव होती की, हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात; शिरसाटांचा गौप्यस्फोट, कैलास पाटलांची प्रतिक्रिया

रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. खरातसाठी छत्री धरल्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई झाली, मग खरातचे पाय धरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये, अशी भूमिका धंगेकर यांनी मांडली आहे. चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावण्यात आला, तोच निकष चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. ते म्हणाले, खरात प्रकरणात खरातसाठी छत्री धरल्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का? देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रूपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे. चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल मांडला होता का?

मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा संशय, 55 जणांची तपासणी, 12 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात समोर आलेल्या राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांवरून आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर झालेल्या कारवाईचा दाखला देत धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही कारवाईची मागणी केल्याने या प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळालं आहे. धंगेकरांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us