माजलगावमध्ये गाड्यांच्या रेसचा थरार ठरला जीवघेणा! भाजप नगरसेवकाच्या मुलाच्या कारने दाम्पत्याला उडवलं, दोघांचा मृत्यू

Majalgaon Car Race Accident : माजलगावमध्ये गाड्यांच्या रेसदरम्यान कारच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू, भाजप नगरसेवकच्या मुलाचं नाव समोर.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 23T145403.847

Majalgaon Car Race Accident : बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भरधाव (Beed) कारच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात प्रल्हाद गायकवाड आणि सुनीता गायकवाड यांना आपला जीव गमवावा लागला. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी शहरातील गढी रोडवर हा भीषण अपघात झाला. कारची धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघेही हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने अपघाताची भीषणता स्पष्ट झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरून वेगाने आलेल्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही गंभीर जखमी झाले. प्रल्हाद गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सुनीता यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, धडकेनंतर कारने दाम्पत्याला सुमारे 100 ते 150 फूट फरफटत नेले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराने उघड केला 13 कोटींचा महा’वितरण घोटाळा; भाजप आमदाराच्या मतदारसंघाचाही उल्लेख

या अपघातात भाजपचे स्थानिक नगरसेवक दिलीप मेंडके यांचा मुलगा दक्ष मेंडके कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी दोन मित्रांमध्ये कारची शर्यत सुरू असल्याची चर्चा स्थानिकांकडून केली जात आहे. याच शर्यतीमुळे कारवरील नियंत्रण सुटून दुचाकीला धडक बसल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, शर्यत सुरू होती की नाही आणि अपघातामागचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.

दरम्यान, या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा घटनाक्रम तपासला जात आहे. कारचा वेग, चालकाची निष्काळजी आणि दोन मित्रांमधील कथित शर्यत या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. दाम्पत्याच्या मृत्यूला जबाबदार कोण, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार असून या घटनेने माजलगाव शहरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

follow us