मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना संसर्ग; अंबाजोगाईच्या रुग्णालयात खळबळ
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या चार रुग्णांच्या बाबतीत गंभीर प्रकार घडला असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Ambajogai Cataract Surgery Infection : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील (Beed) स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना गंभीर जंतुसंसर्ग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या संसर्गामुळे संबंधित रुग्णांची दृष्टी अधू झाल्याचे समोर आले असून, रुग्णालयातील नेत्रशस्त्रक्रिया विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
17 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात एकूण 22 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी चार रुग्णांच्या डोळ्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा जंतुसंसर्ग झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. एकाच वेळी चार रुग्णांना संसर्ग झाल्याने रुग्णालय प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपचारांची व्यवस्था केली. यासाठी लातूर येथून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक बोलावण्यात आले. या पथकाने बाधित रुग्णांवर उपचार सुरू केले, मात्र त्यांच्या डोळ्यांची प्रकृती अपेक्षेप्रमाणे सुधारली नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चारही रुग्णांना पुढील उपचारांसाठी जालन्यातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली.
या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. प्रकरणातील नेमके कारण शोधण्यासाठी सात सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी याबाबत माहिती दिली. ही समिती शस्त्रक्रिया कक्षातील स्वच्छता, वापरण्यात आलेली औषधे तसेच शस्त्रक्रियेसाठी वापरलेल्या उपकरणांची तपासणी करणार आहे. त्यानंतर समितीकडून सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे.
दरम्यान, रुग्णालयाच्या नेत्रविभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानोबा दराडे यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्रक्रियेच्या दिवशी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची आवश्यक तपासणी करण्यात आली होती. तसेच ऑपरेशन थिएटरची स्वच्छता आणि संसर्गाशी संबंधित सर्व मानक तपासण्याही पूर्ण केल्या होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व खबरदारी घेऊनही रुग्णांना संसर्ग झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
रुग्णांच्या डोळ्यांमध्ये संसर्ग नेमका कसा पोहोचला, याचा शोध वरिष्ठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जात आहे. मात्र, संसर्ग होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा रुग्णांच्या दृष्टीवर किती परिणाम झाला आहे आणि त्यांच्यावरील उपचारांचा अंतिम निष्कर्ष काय असेल, याबाबतची अधिकृत माहिती चौकशी आणि वैद्यकीय तपासणीनंतर समोर येणार आहे.