महायुतीतील वादावर एकनाथ शिंदेंनी दिला पूर्णविराम! म्हणाले, ‘मित्रपक्षावर चिखलफेक बंद करा’
Eknath Shinde on Mahayuti Dispute; भाजप आणि शिंदेसेनेतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे, या वादावर शिंदेंनी पुर्णविराम लावला.
Eknath Shinde on Mahayuti Dispute: विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आणि शिंदेसेनेतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या वादाचा परिणाम महायुतीच्या एकजुटीवर होऊ नये, यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे नेते, प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षांवर जाहीर टीका न करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले आहेत.
‘त्या’ व्यक्तीला भगोडा म्हणणं पटत नाही; पुस्तक प्रकाशनापूर्वीच संजय राऊतांच्या विधानाने नवा वाद
गुरुवारी (29 ऑक्टोबर) रात्री शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये निर्माण झालेला विसंवाद आणखी वाढवू नका, अशा सूचना दिल्या. निवडणुकीत नेमकं कुठे चुकलं, याचं महायुती म्हणून सर्वांनी मिळून आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, याची काळजी घ्या. आपापसात वाद घालून विरोधकांना आयतं कोलीत देऊ नका, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचं समजतं.
याशिवाय महायुतीमध्ये नेमक्या कुठे त्रुटी राहिल्या, याचा सविस्तर अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. हा अहवाल आगामी महायुती समन्वय समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे. या बैठकीला महायुतीतील वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार असून, निवडणुकीतील निकाल आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर चर्चा होणार आहे.
मित्रपक्षांवर जाहीर टीका करू नका!
दरम्यान, शिवसेनेच्या कोणत्याही प्रवक्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने सध्या माध्यमांसमोर जाऊन भाजप किंवा अन्य मित्रपक्षांवर टीका करू नये, अशा कडक सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. महायुतीत एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा एकत्रितपणे काम करण्यावर भर द्या, असं त्यांनी नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे.
भाजपने शिंदेसेनेची जिरवली, फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केली; विजय वडेट्टीवारांचा टोला
एकीकडे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करून हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांच्या या सूचनांनंतर महायुतीतील नेते आणि प्रवक्ते आपली भूमिका बदलतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.