एका जागेच्या हट्टापायी तीन जागी हारलो; पदरी पराभव येताच शिंदेसेना भाजपच्या ‘टार्गेट’ वर!
BJP Targets Shinde Shiv Sena एका जागेसाठी मित्रपक्षांनी घेतलेली भूमिका इतर जागांवरील विजयाच्या संधीवर पाणी फेरणारी ठरल्याचा भाजपचा आरोप
BJP Targets Shinde Shiv Sena After Defeat In 3 Seats : निवडणुकीत एकत्र लढण्याच्या आणाभाका, विजयासाठी केलेले दावे आणि निकालानंतर सुरू झालेली एकमेकांवरची चिखलफेक, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीनंतर महायुतीत असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. पाचपैकी तीन जागांवर पराभव झाल्यानंतर भाजपने आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. पुण्यात एका जागेसाठी घेतलेल्या भूमिकेमुळे इतर जागांवरील विजयाच्या संधी गमावल्या, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. त्यामुळे निकालानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
पुण्यात सचिन सानपांना पाठिंबा; भाजपची शिंदेसेनेवर नाराजी
विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालात महायुतीला दोन, तर महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. या निकालानंतर भाजपने पराभवाची कारणं शोधण्यास सुरुवात केली असून, त्यात शिंदेसेनेच्या भूमिकेवर बोट ठेवण्यात आलं आहे. बन यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असूनही शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला. या निर्णयामुळे महायुतीच्या एकजुटीला धक्का बसला. एका जागेवर आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात मित्रपक्षांच्या विजयाच्या संधीवर परिणाम झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
संभाजीनगरमध्येही राष्ट्रवादीविरोधात प्रचार केल्याचा आरोप
भाजपच्या नाराजीचं दुसरं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय भूमिका. शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात थेट प्रचार केल्याचा आरोप बन यांनी केला आहे. या भूमिकेचाही महायुतीला फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना आणि भाजप हे राज्यात सत्तेचे भागीदार असले, तरी स्थानिक राजकारणात दोन्ही पक्षांची गणितं वेगवेगळी असू शकतात. मात्र, निवडणुकीच्या मैदानात मित्रपक्षांनी एकमेकांना साथ दिली नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण आघाडीच्या कामगिरीवर होऊ शकतो, असाच यामागचा भाजपचा युक्तिवाद असल्याचे जाणकांरांचे मत आहे.
‘युतीधर्म’ पाळला असता तर पाचही जागा जिंकल्या असत्या
बन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आणखी एक महत्त्वाचा दावा केला आहे. ते म्हणातात की, शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही. बन यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाच जागांचा निकाल काय सांगतो?
– पुणे पदवीधर : हर्षदा जाधव-देशमुख — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष
– पुणे शिक्षक : कौस्तुभ गावडे — भाजप
– अमरावती शिक्षक : किरण सरनाईक — शिवसेना (शिंदे गट)
– मराठवाडा पदवीधर : डॉ. प्रताप पाटील — राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष
– नागपूर पदवीधर : अभिजीत वंजारी — काँग्रेस
पराभवापेक्षा मित्रपक्षांतील अविश्वासाची चर्चा अधिक
समोर आलेल्या निवडणुकीतील पराभवाचं विश्लेषण करताना सहसा उमेदवारांची निवड, स्थानिक राजकीय समीकरणं, मतदारांचा प्रतिसाद आणि प्रचारातील त्रुटी यांचाही विचार करावा लागतो. मात्र, मिळालेल्या पराभवानंतर भाजपकडून थेट शिंदेसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाल्याने आता चर्चेचा रोख निकालापेक्षा महायुतीतील अंतर्गत संबंधांकडे वळला आहे. एका जागेवरून सुरू झालेला वाद आता महायुतीतील विश्वासाच्या परीक्षेपर्यंत पोहोचला असून, भाजपने आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. यावर आता शिंदेसेना काय भूमिका घेते आणि भविष्यात मित्रपक्षांमधील समन्वय कसा राखला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.
शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही.
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 29, 2026