कालबाह्य अन्नपदार्थांची पुन्हा पॅकिंग करून विक्री, एफडीएचा महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आदेश, 5 कोटींचा साठा जप्त

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आदेश जारी केला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 30T175956.938

Repackaging and selling expired food products : कालबाह्य झालेले किंवा खराब झालेले अन्नपदार्थ नष्ट केल्याचे कागदोपत्री दाखवायचे आणि प्रत्यक्षात त्याच अन्नपदार्थांची पुन्हा पॅकिंग करून बाजारात विक्री करायची, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आदेश जारी केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत या नव्या आदेशाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारांविरोधात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालबाह्य झालेले, खराब झालेले किंवा ग्राहकांकडून परत आलेले अन्नपदार्थ नियमानुसार नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, काही कंपन्या आणि संबंधित घटकांकडून या प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार केले जात असल्याचे समोर आले आहे. अन्नपदार्थांची विल्हेवाट लावल्याचे केवळ कागदोपत्री दाखवले जाते. प्रत्यक्षात हा माल काही एजंटच्या माध्यमातून पुन्हा बाजारात आणला जातो. त्यानंतर त्याचे नव्याने पॅकेजिंग करून ग्राहकांना विकले जाते. काही ठिकाणी उत्पादनाच्या तारखांमध्येही फेरफार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी FDAने स्वतंत्र कॉम्प्लायन्स ऑर्डर काढली आहे.

बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता, चमोलीत क्रॅश झाल्याचा संशय, 5 प्रवाशांसह पायलटचा शोध सुरू!

या नव्या आदेशानुसार, कालबाह्य, खराब झालेले किंवा परत आलेले अन्नपदार्थ योग्य पद्धतीने नष्ट केल्याचा ठोस पुरावा संबंधित कंपन्यांना सादर करावा लागणार आहे. तसेच असा माल चांगल्या अन्नपदार्थांपासून वेगळा ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी असलेल्या विल्हेवाट लावणाऱ्या कंपन्यांकडून अन्नपदार्थ नष्ट केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र घेण्याची तरतूदही या आदेशात करण्यात आली आहे. कंपनी लहान असो किंवा मोठी, कालबाह्य झालेल्या अन्नपदार्थांची एकही पिशवी पुन्हा बाजारात विक्रीसाठी येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, अशा गैरप्रकारांविरोधात FDAकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कारवाई केली जात आहे. भिवंडीतील गुलजार नगर परिसरात सुरुवातीला 80 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर याच परिसरात 26 लाख रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला. वडपे परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून माल जप्त करण्यात आला, तर संबंधित परवाना निलंबित करण्यात आला. याशिवाय अंबरनाथ आणि पडघा येथेही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत अशा एकूण 10 कारवायांमध्ये सुमारे 5 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून, दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये मालकांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला असून, एकूण 32 आरोपींवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

भूतानमध्ये हिमनदीचे सरोवर फुटून जलप्रलय, रस्ते वाहून गेले, भारतातील सीमावर्ती जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी FDAच्या कारवाईमागील व्यापक उद्देशही स्पष्ट केला. केवळ छापे टाकणे किंवा गुन्हे दाखल करणे, हे प्रशासनाचे अंतिम उद्दिष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. कारवाया वाढल्याने नेमका काय फरक पडला, असा प्रश्न उपस्थित केला जात असला, तरी कारवाई हे केवळ नियमांची अंमलबजावणी करण्याचे एक माध्यम आहे. अन्न व्यवसायातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून नियमांचे पालन करणारी सक्षम यंत्रणा उभी करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत विविध क्षेत्रांसाठी 22 कॉम्प्लायन्स ऑर्डर जारी करण्यात आल्या आहेत. हॉटेल व्यवसाय, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच शालेय पोषण आहार अशा विविध क्षेत्रांमध्ये कोणते नियम पाळणे आवश्यक आहे, याबाबत या आदेशांमधून स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

कालबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची पुन्हा पॅकिंग करून विक्री करण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नव्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून अशा गैरप्रकारांना आळा घालण्याचे मोठे आव्हान आता अन्न व औषध प्रशासनासमोर असणार आहे.

follow us