तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर FDA ॲक्शन मोडमध्ये, भेसळखोरांविरोधात राज्यभर फेस्टिव्ह क्रॅकडाउन

नवरात्रोत्सावादरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 9 कोटी 11 लाख रुपयांचा निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design 78

Statewide festive crackdown against adulterators : राज्यात अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएकडून भेसळखोरांविरोधात धडक कारवाई सुरूच आहे. एफडीए आयुक्ततुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अन्नपदार्थांमध्ये भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर परवाने निलंबित करण्यासह कठोर कारवाई केली जात आहे. आगामी दिवाळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर एफडीएने राज्यभरात फेस्टिव्ह क्रॅकडाऊन मोहीम हाती घेतली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सावादरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 9 कोटी 11 लाख रुपयांचा निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 7 आस्थापने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय 22 गुन्हे दाखल करण्यात आले असून 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल 8 हजार 392 किलो मुदतबाह्य, खराब आणि नाकारलेला अन्नसाठा देखील जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागात 4 कोटी 19 लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. तसेच राज्यभरात 3 कोटी 15 लाख रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत. नष्ट करण्यासाठी निश्चित केलेला अन्नसाठा पुन्हा बाजारात आणून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

मतदार यादीतील चुका शोधणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती देण्यास निवडणूक आयोगाचा नकार; AI च्या वापराबाबतही मौन

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या सहाही विभागांत ही मोहीम राबवण्यात आली. दिवाळीच्या काळात मिठाई, खवा, खाद्यतेल, सुकामेवा आणि फराळाच्या पदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी तपासणी आणि कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या सोलापूर विभागातील झोन-2 ने माळशिरस येथे मोठी कारवाई केली. पुणे-पंढरपूर मार्गावर खव्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून सुमारे 1,336 किलो खवा जप्त करण्यात आला. या खव्याची किंमत अंदाजे 4 लाख 81 हजार रुपये असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, MH 25 AJ 4023 क्रमांकाच्या वाहनातून धाराशिव जिल्ह्यातील तीन उत्पादकांनी तयार केलेला खवा सातारा शहरातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना विक्रीसाठी नेला जात होता. खव्याची तपासणी केल्यानंतर तो नाशवंत असल्याने प्रशासनाने तो खड्ड्यात टाकून नष्ट केला.

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी एफडीएने कारवाईचा वेग वाढवला आहे. त्यामुळे अन्नपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

follow us