Prahar: The Untold Story of Ujjwal Nikam : आपल्या सुरेल आवाजाने लाखो श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका श्रेया घोषाल आणि लोकप्रिय गायक सोनू निगम पुन्हा एकदा एका रोमँटिक गाण्यासाठी एकत्र आले आहेत. ‘तुझ में बसी मेरी जान’ असं या नव्या गाण्याचं नाव असून, ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या आगामी चित्रपटातील हे प्रेमगीत आहे. टी-सीरिजच्या माध्यमातून हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात प्रेमातील हळवे क्षण, आपुलकी आणि सहजीवनातील आनंद अनुभवायला मिळतो.
या गाण्याला संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केलं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हिंदी गीतलेखन केलं असून, मराठी गीतलेखन अमेय दयाळ यांनी केलं आहे. श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या सुरेल आवाजाची जादू या गाण्यात पुन्हा एकदा अनुभवायला मिळते. प्रेमात मिळणारी आपुलकी, एकमेकांच्या सहवासात मिळणारा आनंद आणि जोडीदारामध्येच आपलं संपूर्ण जग सापडल्याची भावना या गाण्यातून सुंदरपणे व्यक्त करण्यात आली आहे.
चित्रपटातील लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्यातील सुंदर केमिस्ट्री, एकमेकांकडे पाहताना होणारी नजरानजर, खट्याळ क्षण आणि प्रेम व्यक्त करण्याच्या छोट्या-छोट्या कृती यामुळे गाण्याला खास रंगत आली आहे. दोघांच्या नात्यातील सहजता आणि जिव्हाळा या गाण्यातून उलगडतो. त्याला श्रेया आणि सोनू यांच्या भावस्पर्शी आवाजाची साथ लाभल्याने हे प्रेमगीत अधिकच खास बनलं आहे.
अमेरिकेचा भारतीय IT कंपन्यांना मोठा दणका! 6 कंपन्यांवर कारवाई, भारतीयांचं ग्रीन कार्ड अडकणार?
या गाण्याविषयी बोलताना श्रेया घोषाल म्हणाली, “‘तुझ में बसी मेरी जान’ हे प्रेम, सहजीवन आणि नात्यातील छोट्या-छोट्या आनंदाच्या क्षणांचा उत्सव साजरा करणारं सुंदर गाणं आहे. या गाण्यात एक उबदार आणि रोमँटिक भावना आहे. ती आपल्या आवाजातून व्यक्त करणं मला खूप आवडलं. सोनूजींसोबत पुन्हा गाणं गाण्याचा अनुभव नेहमीच खास असतो. या गाण्याच्या बाबतीतही तो तितकाच सुंदर होता. पडद्यावर राजकुमार आणि वामिका यांच्यातील केमिस्ट्री आणि त्यांच्या लग्नसोहळ्यातील हळवे क्षण पाहिल्यानंतर हे गाणं आणखी खास वाटलं. हे गाणं ऐकताना श्रोत्यांनाही असाच आनंद आणि प्रेमाची ऊब अनुभवायला मिळेल, अशी आशा आहे.”
गायक सोनू निगम यांनीही या गाण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “‘तुझ में बसी मेरी जान’ हे प्रेमाच्या साध्या, पण सुंदर भावनांचा उत्सव साजरं करणारं गाणं आहे. इतकी ऊब आणि भावना असलेल्या सुरेल गाण्यासाठी श्रेयासोबत पुन्हा एकत्र येणं आनंददायी होतं. तिच्या आवाजातील संवेदनशीलता या गाण्याला एक वेगळीच उंची देते. आम्ही दोघांनी मिळून श्रोत्यांच्या मनाला भिडणारं आणि दीर्घकाळ लक्षात राहील असं गाणं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकुमार आणि वामिका यांच्यातील केमिस्ट्री गाण्यातील भावनांना उत्तम प्रकारे पूरक ठरते. हे गाणं तयार करताना आम्हाला जितका आनंद मिळाला, तितकाच आनंद प्रेक्षकांनाही ते ऐकताना मिळेल, अशी अपेक्षा आहे.”
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट! जगतापांना भाजपचा पाठिंबा, राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या गाण्यात लग्नातील आनंदी वातावरण, प्रेमळ क्षण आणि एकत्र आयुष्य जगण्यातील छोट्या-छोट्या आनंदांचं चित्रण करण्यात आलं आहे. दोन्ही कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि श्रेया घोषाल व सोनू निगम यांचे सुरेल स्वर यांचा सुंदर मिलाफ या गाण्यात पाहायला आणि ऐकायला मिळतो.
दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अविनाश अरुण धवरे यांनी केलं आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘तुझ में बसी मेरी जान’ हे गाणं सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालं आहे. या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.
