Sakharam Binder Play Actress Neha Joshi In Lakshmi Role : प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि 50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेले ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’ची अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेविषयी आणि नाटकाविषयी बोलताना तिने अनेक गोष्टी उघड केल्या.
नेहा जोशीने (Neha Joshi) सांगितले की, सखाराम बाईंडर हे (Sakharam Binder) नाटक 50 वर्षांपूर्वीचे असले तरी त्याचा विषय आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मला या नाटकातील लक्ष्मीची व्यक्तिरेखा खूप भावली. वरकरणी सहनशील आणि कमकुवत वाटणारी लक्ष्मी आतून खूप कणखर आहे. लग्नसंस्थेवर आणि देवावर श्रद्धा असणाऱ्या लक्ष्मीचे (Lakshmi), लग्नसंस्थेच्या पूर्ण विरोधात असलेल्या सखारामसोबतचे नाते कसे जुळते, हे नाटकातून पाहायला (Entertainment News) मिळेल. 50 वर्षांनंतर आपण कलाकृती स्वीकारण्याच्या दृष्टीने किती पुढे आलो आहोत, हेही यानिमित्ताने समजून घेता येईल.
सुमुख चित्र निर्मित, या नाटकाचे निर्माते मनोहर जगताप आणि कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. नाटकाचे दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केले आहे. संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे. संकेत गुरव यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. नेहाने सांगितले की, विजय तेंडुलकरांसारख्या सिद्धहस्त नाटककाराच्या संहितेला धक्का लावणं योग्य नाही, त्यामुळे मूळ संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
कवी प्रकाश होळकर यांनी नेहाचे नाव अभिनेता सयाजी शिंदे यांना सुचवले आणि दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांच्या मनातही तिचे नाव होते. सयाजी शिंदे यांच्यासारख्या मोठ्या आणि अनुभवी कलाकारासोबत काम करण्यापूर्वी सुरुवातीला थोडं दडपण येणं स्वाभाविक होतं. पण जेव्हा ते एखादी भूमिका करतात, तेव्हा ते केवळ एक कलाकार म्हणून तुमच्यासमोर येतात. त्यांच्या अभिनयात इतके समरस होतात की त्यांचे मोठेपण आणि नावाचा लौकिक आपोआप बाजूला सारला जातो. त्यांच्यासोबत काम करताना कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा जवळून अनुभवता आला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.
नेहाने प्रेक्षकांना नाटक पाहण्याचे आवाहन केले आहे. आता काळ बदलला आहे आणि कलाकारही वेगळे आहेत. तुम्हाला नाटक आवडेल किंवा नाही, तुमच्या सर्व प्रतिक्रिया आम्हाला कळवा. यामुळे आम्ही विजय तेंडुलकरांच्या विचारांपर्यंत कितपत पोहोचू शकलो, हे समजून घेण्यास मदत होईल.