प्रेरणा जंगम
Samar Kuber: सध्या मराठी मालिकाविश्वात विविध विषयांवर मालिका पाहायला मिळत आहेत. विविध नाती असलेल्या या मालिकांमध्ये आणखी एक नवी मालिका (Serial) सहभागी होत आहे. या मालिकेत पाहायला मिळणार आहे बहिण– भावाचं नातं. बहिण भावाच्या नात्यातील धाग्यावर आधारित आहे, कस्तुरी (Kasturi ) ही नवीकोरी मालिका. कलर्स मराठी वाहिनीवर ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या मालिकेत पाहायला मिळणार आहे निलेश आणि कस्तुरी या भावा– बहिणीचं नातं. या मालिकेत समर कुबेर (Samar Kuber) हे महत्त्वाचं पात्र देखील पाहायला मिळणार आहे. जे साकारत आहे. मराठी टेलिव्हिजीन विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेता अशोक फळदेसाई (Actor Ashok Phaldesai). कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला येडा पिसा (Jeev Zala Yeda Pisa) या मालिकेत शिवा दादाच्या भूमिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली होती. त्या मालिकेतील सिद्धी आणि शिवाची जोडी लोकप्रिय ठरली. रांगडा शिवा ते आता समर कुबेर असा त्याचा हा प्रवास आहे.
आता या नव्या मालिकेतून अशोक एक वेगळं पात्र साकारताना दिसणार आहे. तर अभिनेत्री एकता लबडे कस्तुरीची भूमिका साकारणार असून निलेशची भूमिका साकारत आहे, अभिनेता दुष्यंत वाघ. तेव्हा महाराष्ट्रभर आनंदाचा गंध पसरवायला “कस्तुरी” २६ जूनपासून सोम ते शनि रात्री १०.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर प्रदर्शित होत आहे.
या नव्या मालिकेतील भूमिकेविषयी अशोक सांगतो की, “कलर्स मराठीवर पुन्हा एकदा काम करणं म्हणजे माझ्यासाठी घरी परत आल्यासारखंच आहे. मी गेल्या तीन- चार वर्षांत ज्या भूमिका केल्या त्या ग्रामीण बाजाच्या होत्या. यावेळी पहिल्यांदा मी पूर्णपणे वेगळ्या ढंगाची, वेगळ्या बाजाची भूमिका करत आहे. वेगळ्या प्रकारची भूमिका तीही कलर्स मराठी सारख्या वाहिनीवर याचा मला खूप आनंद आहे. आताची भूमिका ही आधीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. आणि या पात्रासाठी मी खूप तयारी करत आहे. मला अशी वेगळ्या प्रकारची भूमिका करतांना आनंद मिळतोच आहे, पण तुम्हाला सर्वांना पण ही भूमिका बघायला खूप आवडेल याची मला खात्री आहे.
Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात
या आधी तुम्ही जीव झाला येडा पिसा मालिकेमधील शिवा या पात्रावर भरभरून प्रेम केलंत तसं कस्तुरी या मालिकेवर आणि या मधल्या समर कुबेर या पात्रावर असेच प्रेम करावे ही इच्छा आहे. “श्री अधिकारी ब्रदर्स “ या नावाजलेल्या प्रोडक्शन हाऊसशी मी जोडला गेलोय याचा मला खूप आनंद आहे. समर कुबेर या पात्राबद्दल सांगायचं झालं तर तो खूप स्मार्ट आहे, शिकलेला आहे, श्रीमंत घरातला आहे. त्याचा त्याच्या घरच्यांवर खूप जीव आहे, सर्वांना मान देणारा आहे. त्याला राजकारणात प्रचंड रस आहे. तो एक निस्वार्थी राजकारणी आहे. लोकांची सेवा करणारा, अडल्या नडल्याना मदत करणारा आहे. विचार करून निर्णय घेणारा असा हा समर कुबेर आहे. येतोय मी दुप्पट ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.”
तेव्हा या मालिकेत समरच्या येण्याने अशी कुठली घटना घडणार ज्यामुळे तिघांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळणार ? समरच्या मनात दडलेलं असं कुठलं सत्य आहे, ज्यापसून कस्तुरी अनभिज्ञ आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्यासोबत असणारी कस्तुरी अचानक आपल्या भावाशी अबोला का धरते ? त्यांच्या नात्यात दुरावा का येतो ? असं काय घडतं या दोघांचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते ? नात्यांना जोडणारी, घट्ट धरून ठेवणारी कस्तुरी असा टोकाचा निर्णय का घेते ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मालिकेतून समोर येणार आहे.