मुंबई : पत्त्याच्या खेळात हरलेला पती थेट पत्नी डावावर लावत करारनामा करतो. ऐकूनच चीड येणारी ही गोष्ट आहे. मात्र असाच एक वेगळा विषय ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात पाहायला मिळतोय. एक हटके कहाणी असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आणि उत्कंठा वाढवणारा आहे.
नितीन सिंधुविजय सुपेकर लिखीत, दिग्दर्शित सरला एक कोटी या चित्रपटात सत्य घटनांवरुन प्रेरित गावाकडील एक हटके कहाणी सादर करण्यात आली आहे. उत्तम कलाकारांच्या फळीने या चित्रपटाला आणखी रंजक बनवलं आहे. ही कहाणी आहे नवलेवाडी गावातील भिकाजी वखरेची. आई मथुरासोबत राहणाऱ्या भिकाचं लग्न एक अतिशय सुंदर, देखण्या सरला नावासोबतच्या मुलीसोबत होतं. लग्नानंतर त्याचं आयुष्यच बदलतं.
पत्त्याचा नाद असलेल्या भिकाच्या आयुष्यात सरला नावाची हुकमाची राणी येते. सरलाच्या सौंदर्याची अख्ख्या नवलेवाडीला भुरळ पडते. यातच भिका पत्त्याच्या खेळात पत्नी सरलाला डावावर लावतो आणि दारुच्या नशेच तिचा करारनामा करतो. हा डाव मात्र भिका हरतो. त्यानंतर बायको ऐवजी एक लाख रुपये जमा करण्याची मुदत भिकाला मिळते. या सगळ्यात पैश्यांच्या मदतीच्या आशेने जाणाऱ्या लोकांकडूनही भिकाकडे त्याच्या पत्नीची मागणी केली जाते.
या सगळ्यातून भिका आणि त्याचं कुटुंब कसं बाहेर पडतं ? पत्नीसाठी भिका एक लाख रुपये जमा करु शकतोय का ? या अडचणीत त्याला येणारे अडथळे काय आहेत ? हे चित्रपटात हळूहळू समोर येतं. या चित्रपटाची हटके कथा चित्रपटाची जमेची बाजू आहे. जिथे चित्रपट पुर्वार्धात धिम्या गतीने पुढे जाते तर उत्तरार्ध अधीक रंजक वाटतो.
या कथेच्या सादरीकरणात विविध पात्र साकारणाऱ्या कलाकारांचं उत्तम काम चित्रपटाची जमेची बाजू आहे. भिकाजीच्या भूमिकेत ओंकार भोजनेने साध्याभोळ्या भिकाचं पात्र उत्तम साकारलय. ओंकारचा वास्तववादी अभिनय या पात्राला न्याय देतेय. तर दुसरीकडे सरलाच्या भूमिकेत अभिनेत्री ईशा केसकर भाव खाऊन जाते. आपल्या पतीला साथ देणार सौंदर्यवती सरला आणि तिचा निरागसपणा ईशाने सहजपणे सादर केलाय. मात्र तिच्या वाट्याला आणखी सीन असते तर तिचं पात्र आणखी समोर आलं असतं.
भिकाची आई मथुराच्या भूमिकेत अभिनेत्री छाया कदम यांचं पात्रही लक्षवेधी आहे. याशिवाय जतीन ईनामदार, कमलाकर सातपुते, यशपाल सरताप, महेंद्र खिल्लारे, रमाकांत भालेराव, वनिता खरता, कपिल कांबळे, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, अभिलाषा पॉल या कलाकारांनी साकारलेली पात्रेही लक्ष वेधून घेणारी आहेत.
नितीन सुपेकर यांनी दिग्दर्शनातून कथेचं उत्तम सादरीकरण केलय. कथेचा विषय उत्तम हाताळण्यात आलाय. कलाकारांकडून योग्य काम काढून घेतलय. मात्र काही सीन्स वेळखाऊ वाटतात आणि कथेची गती मंदावते. अनेक सीन लांबवल्याचं जाणवतं, जिथे ते कंटाळवाणे वाटू शकतात. महेंद्र खिल्लारे यांच्या संवाद लेखनात कमतरता जाणवते.
संवादातून सीन आणखी खुलवण्यास वाव होता. गुरु ठाकूर, विजय गवंडे यांनी लिहीलेली गाणी छान वाटतात. विजय गवंडे यांचं संगीत आणि पार्श्वसंगीत कथेला साजेसं आहे. तर नागराज दिवाकर यांचं छायांकन काही सीन्स छान खुलवतात. तर नितेश राठोड यांचं संकलनही चांगलं झालंय. उत्कंठा कायम ठेवणारा क्लायमॅक्सचा कालावधी वाढवला असता तर आणखी रंजक वाटलं असतं.हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नजरा खिळवून ठेवतो. हटके कथा आणि त्याचं कलाकारांनी केलेलं उत्तम सादरीकरण रंजक ठरतं.
रेटिंग – 2.5 स्टार्स
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक