ठाणे : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक सुधीर नांदगावकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला.
गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर दुपारी तीनच्या सुमारास माजीवाडा येथे वास्तव्यास असलेले सुधीर नांदगावकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
जगभरातील चांगल्या दर्जाचे चित्रपट इथल्या मराठी रसिकांना पाहता यावेत आणि त्यावर एकत्रित चर्चा व्हावी यासाठी त्यांनी प्रभात चित्र मंडळ या त्यांच्या फिल्म सोसायटी चळवळीमार्फत बरीच धडपड केली.
परदेशी चित्रपट म्हणजे हॉलिवूडचे चित्रपट या समजातून बाहेर काढून जगभरातील चित्रपटांच्या विविध जागतीक प्रवाहांशी मराठी रसिकांना जोडण्याचे काम केले.
प्रभात चित्र मंडळ या मुंबईतील फिल्म सोसायटी मार्फत येथील सुजाण मराठी रसिकांना तसेच साहित्य, संगीत व नाटक या क्षेत्रातील जाणकारांना या चळवळीशी जोडले.
मुंबईतील सर्वात जुनी फिल्म सोसायटी ‘प्रभात चित्र मंडळ’, ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ आणि चित्रपट समिक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना ‘फिप्रेस्की’ यांमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता आणि उत्तम संघटक अशी सुधीर नांदगावकर यांची ख्याती होती.
सुधीर नांदगावकर यांच्या फिल्म सोसायटी चळवळीचे महत्वाचे पैलू म्हणजे दर्जेदार चित्रपट विषयक मजकूर देणारे ‘वास्तव रूपवाणी’ हे नियतकालिक. तसेच ‘मामी’ आणि ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण आणि नावाजलेले दोन चित्रपट महोत्सव.
भारतीय व जगभरातील विविध क्षेत्रातील आणि प्रवाहातील चित्रपटांचे चित्रीकरण या महोत्सवांमधे करण्यात आले. रसिकांना आणि मराठी चित्रपट सृष्टीतील जाणकारांना ते पाहता व अभ्यासता आले.
सत्यजित राय हे चित्रपटातील दैवत. तर अटल बिहारी वाजपेयी राजकारणातील. आज डिजिटली जग खूप पुढे गेलेल आहे आणि चित्रपट पाहण्याची विविध असंख्य माध्यम उपलब्ध आहेत. तरिही ‘थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव’ आयोजित करणे व बदलत्या काळात ‘प्रभात चित्र मंडळ’ औचित्यपूर्ण ठेवणे हे त्यांचे ध्यासपर्व आजतागायत सुरु होते.