वध 2: पॉवर पॅक्ड मर्डरमिस्ट्री…

Vadh 2 Movie Review: हा सिनेमा दिशाभूल करणाऱ्या सूक्ष्म संकेतांवर, फसव्या पुराव्यांवर आणि हुशार वळणांवर उभा आहे...

  • Written By: Published:
VADH 2 FILM

Vadh 2 Movie Review : जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शिरवळकरांचे निष्ठावंत वाचक आहात, फिरोज इराणी किंवा मंदार पटवर्धन यांचे नातेवाईक आहात किंवा अगदी शेरलॉक होम्सचे वारसदार आहात आणि प्रत्येक मर्डर मिस्ट्रीमध्ये पहिल्या दहा मिनिटांत खुनी ओळखण्याचा आत्मविश्वास असेल… तर Vadh 2 तुमच्या या गृहीतकाला तडा देते.

हा सिनेमा दिशाभूल करणाऱ्या सूक्ष्म संकेतांवर, फसव्या पुराव्यांवर आणि हुशार वळणांवर उभा आहे… “आता सापडलं!”, “हेच आहे उत्तर!” असं वाटत असतानाच कथा वेगळ्याच दिशेला वळते… आणि प्रेक्षकाला गुंगारा देते…

कथा आणि मांडणी

“वध २” हा पहिल्या भागाचा थेट सिक्वेल नसून एक स्वतंत्र आणि पूर्णपणे नवीन कथा आहे. एक खून होतो… पण कोणाचा? का? आणि कोणी केला? हे उघड करणं म्हणजे सिनेमाच्या गाभ्याला धक्का लावल्यासारखे होईल.

इतकंच सांगता येईल की, या कथेला अनेक पदर आहेत. ते एकामागोमाग अलवारपणाने उलगडताना पटकथा इतकी प्रभावी ठरते की शेवटपर्यंत तुमचा अंदाज सतत बदलत राहतो… प्रत्येक पात्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि शेवटी येणारा क्लायमॅक्स तुमच्या सगळ्या गृहितकांना छेद देतो. यासाठी special brownie points द्यायला हवेत ते जसपाल संधू आणि नेहा शितोळे यांना…

पटकथा आणि वेग
२ तास १० मिनिटांचा कालावधी असूनही एकही क्षण कंटाळवाणा वाटत नाही. स्क्रीनप्ले इतका टाईट आहे की तुम्ही कायम अलर्ट मोडमध्ये राहता. इथे जसपाल संधू आणि नेहा शितोळे यांना क्रेडिट द्यायला हवं…

प्रत्येक सीन खात्री देतो की, तुम्ही बरोबर दिशेने विचार करताय… आणि नेमक्याच क्षणी तो सिनेमा तुमचा अंदाज मोडून काढतो. हीच या सिनेमाची खरी मजा आहे.

संवाद ही तिथेच दिलखेच आणि प्रभावी आहेत… अन् ते त्याच ताकदीने कलावंतांनी पोहोचवले आहेत, ही जमेची बाजू.

दमदार अभिनेत्यांची फौज –
संजय मिश्रा – प्रेमळ, भित्रा, असहाय्य आणि संशयी अशा सर्व छटा इतक्या सहज साकारतो की हा अभिनय म्हणजे फुल ऑन पॅकेज!

नीना गुप्ता – सौम्यतेतून ताकद दाखवणारी भूमिका. त्यांच्या असण्याने सिनेमाला भावनिक खोली मिळते…

कुमुद मिश्रा- जातीयतेवर ठाम विश्वास ठेवणाऱ्या जेलरच्या भूमिकेत प्रभावी.

शिल्पा शुक्ला– संयत पण लक्षात राहणारी.

योगिता बिहानी– सहज, नैसर्गिक अभिनय.
अमित सिंग – संयत
अक्षय डोग्रा – लक्षवेधी

दिग्दर्शन आणि लेखन

जसपाल संधूयांचे लेखन-दिग्दर्शन प्रामाणिक आणि परिणामकारक आहे. त्यांनी मर्डर मिस्ट्रीला फक्त “कोण खुनी?” एवढ्यावर मर्यादित न ठेवता मानवी नातेसंबंध, भीती, लालसा आणि अपराधभाव यांचे सूक्ष्म पदर अलगदपणे उलगडले आहेत.


का पाहावा?

मेंदूला चालना देणारा थरार
हुशार ट्विस्ट्स आणि दमदार पटकथा
दर्जेदार अभिनय
का टाळावा?

तुम्हाला मर्डर मिस्ट्री अजिबात आवडत नसेल तर.

थोडक्यात काय ?
मोठ्या स्टार्सच्या झगमगाटापलीकडे जाऊन अस्सल कलावंतांचा दमदार अभिनय आणि ताकदीचं कथानक असलेला, पॉवर-पॅक्ड मर्डर मिस्ट्री अनुभव.हा सिनेमा थिएटरमध्येच पाहायला हवा.

मी देतो पाचपैकी चार स्टार

अमित भंडारी, चित्रपट समीक्षक

follow us