Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या आगामी ‘किंग’ (kinf) या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. चित्रपटाच्या परदेशातील थिएटर वितरण हक्कांची तब्बल 175 कोटी रुपयांना विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय चित्रपटाच्या परदेशी वितरण हक्कांसाठी मिळालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच ‘किंग’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट वितरण क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘फार्स फिल्म्स’ने (Phars Films) तब्बल 175 कोटी रुपये म्हणजेच 18 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम मोजून ‘किंग’चे परदेशातील थिएटर वितरण हक्क मिळवले आहेत. विशेष म्हणजे ही डील मिनिमम गॅरंटी (MG) तत्त्वावर झाल्याचे सांगितले जात आहे, असे वृत्त पिंकविलाने (Pinkvilla) दिले आहे.
यापूर्वी शाहरुख खानच्या चित्रपटांचे परदेशातील वितरण प्रामुख्याने यशराज फिल्म्सकडून केले जात होते. 2023 मध्ये यशराज फिल्म्सने ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांचे वितरण केले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवत परदेशातही मोठी कमाई केली होती. मात्र, आता ‘किंग’च्या वितरणाची जबाबदारी फार्स फिल्म्सकडे आली आहे. फार्स फिल्म्सला आंतरराष्ट्रीय वितरण क्षेत्रातील मोठा अनुभव असून, यापूर्वी त्यांनी यशराज फिल्म्ससोबत अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. तसेच प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाचे परदेशात स्वतंत्रपणे वितरणही केले होते.
विशेष म्हणजे, भारतीय चित्रपटांच्या परदेशी वितरण हक्कांसाठी यापूर्वी 100 कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडला गेला नव्हता. अशा परिस्थितीत ‘किंग’ने थेट 175 कोटींची मजल मारल्याने हा व्यवहार ऐतिहासिक मानला जात आहे.
आता या विक्रमी डीलनंतर ‘किंग’समोर बॉक्स ऑफिसवरही मोठी कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे. शाहरुखचा स्टारडम, चित्रपटाची भव्यता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अपेक्षा पाहता, ‘धुरंधर’ आणि ‘आरआरआर’सारख्या चित्रपटांचे परदेशातील कमाईचे विक्रम मोडण्यात ‘किंग’ यशस्वी ठरणार का, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.शाहरुख खानचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
