पुरणपोळी तो मेरा वीक पॉईंट है, मैं जरूर खाऊंगा; जेव्हा धर्मेंद्र तीन तास पाहुणचार घेतात !

Dharmendra हे भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे एका कार्यक्रमासाठी जाणार होते. परंतु त्यांना कार्यक्रमस्थळी थेट तीन तास उशीरा न्यायचे होते.

Shrikant Anantrao Joshi Former Mla artical on Dharmendra

Shrikant Anantrao Joshi Former Mla artical on Dharmendra

Dharmendra Passed Away: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षे निधन झाले. धर्मेंद्र हे खासदार असताना संभाजीनगरला तेव्हाचे औरंगाबादला (SambhajiNagar) आले होते. तेथून ते खामगाव येथे भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे एका कार्यक्रमासाठी जाणार होते. परंतु त्यांना कार्यक्रमस्थळी थेट तीन तास उशीरा न्यायचे होते. त्याची
जबाबदारी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार श्रीकांत अनंतराव जोशी यांच्यावर होती. धर्मेंद्र यांचा वेळ जाण्यासाठी श्रीकांत जोशी यांनी काय-काय केले, याची आठवण जोशी यांनी सविस्तर लिहिली आहे. (Shrikant Anantrao Joshi Former MLA article on Dharmendra)

आज वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळताच त्यांच्यासोबत घालवलेल्या काही क्षणांची आठवण झाली. आज तीच आपल्यासोबत शेअर करत आहे. धर्मेंद्र हे नेता आणि अभिनेता याची उत्तम सांगड घातलेला एक उमदा माणूस! आयुष्यातील काही व्यक्तींची भेट आणि सहवास हा आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देणारा असतो. आज असाच एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी आमदार असताना एक दिवस तत्कालीन प्रदेशाध्यक्ष कै. भाऊसाहेब फुंडकर यांचा मला अचानक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, “श्रीकांत, उद्याचे तुझे सर्व कार्यक्रम रद्द कर आणि मी सांगतो त्याप्रमाणे कर.” पक्षाध्यक्षांचा आदेश म्हणजे तो मान्य करण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्यायही नव्हता. फुंडकरांशी याविषयी सविस्तर बोलणं होईपर्यंत मी कुतूहलमिश्रित दुविधेमध्ये होतो. पण जेव्हा त्यांनी कोणतं काम करायचं याविषयी सांगितलं तेव्हा मात्र मला आनंदाचा धक्का बसला. ते काम असं होतं की, सुप्रसिध्द अभिनेते आणि भाजपाचे बिकानेर येथील खासदार श्री. धर्मेंद्र देओल हे खामगाव येथील एका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते.

फुंडकरांनी त्यांना मोठ्या कष्टानं या सोहळ्यासाठी येण्यास तयार केलं होतं. परंतु समस्या अशी होती की, हा कार्यक्रम सकाळीच संपन्न होईल व आपण संध्याकाळी मुंबईला परत जाऊ शकता या हमीवर फुंडकरांनी धर्मेन्द्रजींना आमंत्रित केलं होतं आणि काही अपरिहार्य कारणामुळं हा सोहळा सुरु होण्यास विलंब होणार होता. धर्मेंद्रजी विमानाने सकाळी औरंगाबादला (आताचे छत्रपती संभाजीनगर) येणार होते आणि तिथून कारने त्यांना खामगावला न्यायचे होते. फुंडकरांनी मला सांगितले की “श्रीकांत, कोणत्याही परिस्थितीत त्यांना घेऊन तू बाराच्या आधी खामगावसाठी प्रस्थान करू नकोस. त्यांना उशिरापर्यंत थांबवण्याची जबाबदारी तुझी.” माझ्यावर जबाबदारी टाकून फुंडकर निश्चिन्तपणे पुढील तयारीसाठी खामगावला रवाना झाले.

सुरवातीला जरी मला आनंद झाला असला तरी प्रत्यक्षात मात्र दडपण आलं. कारण ज्यांना पडद्यावर पहात मी लहानाचा मोठा झालो होतो आणि ज्यांच्या अभिनयाचा मी जबरा फॅन होतो, त्या व्यक्तीशी मी आज प्रत्यक्षात भेटणार होतो. शिवाय त्यांच्या स्वभावाची कोणतीही पूर्व कल्पना मला नव्हती. याशिवाय त्यांचे सामाजिक आणि राजकीय पातळीवर असलेले स्थान हे देखील मला भेडसावत होते. माझ्या सहकार्यासाठी फुंडकरांनी विधान परिषदेचे तत्कालीन उपसभापती कै. वसंतराव डावखुरेजी यांना सोबतीसाठी दिलं. मी माझ्या कुटुंबियांना याची कल्पना दिली. त्यांनी देखील मला पूर्ण पाठिंबा दिला.

मी सकाळी लवकरच डावखुरेजी आणि काही सहकाऱ्यांना घेऊन विमानतळावर गेलो. एअर इंडियाच्या विमानानं धर्मेंद्रजी आले. गोऱ्यापान धिप्पाड शरीरयष्टीच्या त्या देखण्या अभिनेत्याला प्रत्यक्षात पाहून हस्तालोंदन करताना क्षणभर शरीरावर रोमांच उभे राहिले. त्यांच्याशी प्राथमिक गप्पा करत आम्ही त्यांना घरी घेऊन आलो. धर्मेंदजींची आवड-निवड माहित नसल्याने माझी पत्नी किरण हिने साबुदाणा खिचडीपासून, आलुपराठा, पोहे ते ब्रेड ऑम्लेटपर्यंत बरेच पदार्थ बनवले होते. माझ्या कुटुंबियांशी म्हणजे पत्नी किरण व माझ्या दोन कन्या नीलम आणि कांचन यांच्याशी गप्पा मारत धर्मेंद्रजी त्या सर्व पदार्थांचा एक एक करत आस्वाद घेत होते. खात असताना पदार्थांची आणि ते बनवणाऱ्याची स्तुती करताना ते थकत नव्हते. त्यांचा नाष्टा झाला तेव्हा नऊ वाजले होते. अजूनही तीन तास त्यांना थांबवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. यासाठी काय करावे या विंवचनेत मी असतानाच किरणने त्यांच्याकडे पुरणपोळीच्या जेवणाचा आग्रह धरला. तेव्हा धर्मेंद्रजी म्हणाले, “पुरणपोळी तो मेरा वीक पॉईंट है. मैं जरूर खाऊंगा.” मग जेवण बनवण्याची धावपळ आणि पुरणपोळीचे जेवण असा मस्त समा बांधला गेला. धरमजींनी तृप्ततेने पुरणपोळीचा आस्वाद घेतला. नाष्टा ते जेवण या वेळात धरमजींशी गप्पा मारताना डावखुरेजींची ही मला खूप मदत झाली. त्यांनी माझ्याविषयी, माझ्या पक्षातील स्थानाविषयी, माझ्या योगदानाविषयी आणि माझ्या कार्याविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली. धरमजींनीही ती खूप मन लावून ऐकली.

आता अकरा वाजले होते आणि अजूनही एक तास आम्हाला धरमजींना रोखायचे होते. आता काय करावं हा मोठा प्रश्न मला पडलेला असतानाच फोटोग्राफर आणि पत्रकार देवासारखे आमच्या मदतीला धावून आले. मी धरमजींना म्हंटलं की “फॅमिली आपके साथ फोटो खिचना चाहती है.” तेव्हा अगदी विनयानं ते म्हणाले, “क्यूँ नही, हम जरूर सबके साथ फोटो खिचवायेंगे.” आणि मग साग्रसंगीत फोटोसेशन संपन्न झाले.

या सगळ्या सहवासात ते माझ्या कुटुंबियांशी आणि उपस्थितांशी मोठ्या विनयाने आणि प्रेमाने वागले. साधारण बारा वाजता आम्ही खामगावकडे प्रस्थान केले. डावखुरेजी निघतानाच मला म्हणाले कि मी ड्राइव्हर जवळ बसतो तू धर्मेन्द्रजींबरोबर बस. मी त्याप्रमाणे बसलो. या संपूर्ण प्रवासात आमच्या गप्पा रंगल्या. हिंदीत बोलता बोलता कधी कधी माझ्या मुखातून ओघाने मराठी यायचं. पण ते त्या बोलण्यालाही उत्तम प्रतिसाद द्यायचे. त्यांना मराठी बोलता येत नसलं तरी ते उत्तमपणे समजत होतं. मी त्यांना मला आवडलेल्या त्यांच्या चित्रपटांविषयी सांगितलं. सीता और गीता, प्रतिज्ञा, दो चोर, राजा जानी, यादों कि बारात, चरस. त्या चित्रपटांविषयीचे अनुभव त्यांनी माझ्याशी शेअर केले. चरस चित्रपटातील ‘कल कि हसीन मुलकात के लिये’ हे गाणं तर त्यांनी मला पूर्ण म्हणून दाखवलं. त्या संपूर्ण सहवासात ते मला कुठेही रागावलेले अथवा वैतागलेले दिसले नाही.

तो फिर मैं आप लोगोंपर गुस्सा कैसे हो सकता हूँ ?”

आता मात्र माझा संयम सुटला आणि मी त्यांना विचारून टाकलं, “धरमजी, अभि तक तो आपको समझ में आया होगा के हमने आपको जान बुझके थोडा रोकके रखा था, क्या आपको इस बात पे गुस्सा नही आया ?” यावर ते हसले आणि म्हणाले की, “जब राजनीती में मैने कदम रखा तभी मैने ये समझ लिया था कि अब मेरा जीवन मेरा व्यक्तिगत जीवन नही रहा है, वो आम लोगोंका हो गया है और आप भी तो यह सब जनता के लिये कर रहे हो ना ? तो फिर मैं आप लोगोंपर गुस्सा कैसे हो सकता हूँ ?” त्यांच्या उत्तरानं मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. प्रसिध्दीच्या आणि यशाच्या अत्युच्चस्थानी असतानाही संयमी आणि विनयशील कसं रहावं याचं ज्वलंत उदाहरण माझ्यासमोर बसलं होतं. सकाळी सहा वाजेपासून कार्यक्रमासाठी निघालेले धरमजी रात्री दोन वाजेपर्यंत न थकता सगळया कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाले. चित्रपटातल्या हिरोविषयी असलेला माझा समज चूकला. हिरो देखील खूप मेहनती असतात आणि त्यांना इतरांची कदर असते हे मला समजलं. माझ्या मनात एक कलाकार म्हणून त्यांच्याविषयी आदर होताच पण या अनुभवामुळं एक माणूस म्हणून आणि एक राजकारणी म्हणून झालेल्या त्यांच्या परिचयानं तो द्विगुणित झाला.
धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रध्दांजली

श्रीकांत अनंतराव जोशी
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदार संघ

Exit mobile version