उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मनं, अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक

सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट भावत असून, पडद्यावर आपल्याच घरातल्या व्यक्तिरेखा वावरत असल्याचा भास होतोय.

News Photo   2025 12 16T192949.556

उत्तर'मधील 'नन्या'ने जिंकली प्रेक्षकांची मनं, अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ‘उत्तर’ची टीम विविध चित्रपटगृहांना (Film) भेट देत असून, तिथे मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अक्षरशः भारावून टाकणारा आहे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षक कलाकारांशी संवाद साधत आहेत. विशेषतः अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षक अभिनयला गराडा घालत आहेत, त्याची स्तुती करत आहेत. काही आया त्याला भेटताना भावुक होऊन बोलता बोलता रडत असल्याचंही चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रेक्षक अभिनयला आपल्याच घरातला मुलगा मानत आहेत, हीच या चित्रपटाच्या यशाची खरी पावती आहे.

सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट भावत असून, पडद्यावर आपल्याच घरातल्या व्यक्तिरेखा वावरत असल्याचा भास होतोय. रेणुका शहाणे यांनी साकारलेली आई अनेकांना आपल्या स्वतःच्या आईची आठवण करून देते, तर ‘नन्या’ हे पात्र अनेकांना आपल्या आजूबाजूला, घरात किंवा शेजारी दिसत असल्यासारखं वाटतंय. रेणुका शहाणे यांच्या सहज, संयमित अभिनयासोबतच अभिनय बेर्डेने साकारलेला ‘नन्या’ही प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजतोय. अनेक प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या मते, अभिनय बेर्डेच्या आजवरच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे.

उडने की आशाचा नवा हाय-व्होल्टेज प्रोमो प्रदर्शित; रेणुकासमोर उघड होणार रोशनीचं गुपित?

चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच अनेक नामवंत दिग्दर्शकांनी त्याच्या कामाचं कौतुक केलं असून, त्याला ‘डिस्कव्हरी’ असं संबोधलं आहे. अभिनयच्या होत असलेल्या कौतुकाबद्दल दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाले, ”जेव्हा अभिनयला कास्ट केलं, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. परंतु आज चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहताना मला ठामपणे वाटतंय की, माझा निर्णय योग्य होता. या भूमिकेला अभिनयशिवाय कोणीही इतका प्रामाणिक न्याय देऊ शकलं नसतं. तब्बल दहा महिने आम्ही फक्त निनाद कसा असेल, कसा बोलेल, कसा पाहील, कसा वागेल यावर काम केलं.

अभिनयनेही प्रचंड मेहनत घेत १२–१३ किलो वजन कमी केल. आज त्यालाही त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. थिएटर व्हिजिटदरम्यान हाऊसफुल्ल गर्दीतून ‘नन्या सुपर्ब!’ अशी दिलखुलास दाद ऐकली आणि मी अक्षरशः भरून पावलो. झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे निर्मिती सावंत यांच्या भूमिका आहेत. या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात आहे.

Exit mobile version