अमित भंडारी, चित्रपट समीक्षक
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे,
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे!”
पाडगावकरांच्या या ओळी आपल्याला हा सिनेमा पाहताना सतत आठवत राहतात…
जगण्याचा सोहळा हा नेमका कसा असू शकतो… याचा उत्तम प्रत्यय हा सिनेमा पाहताना येतो.
माजीद माजिदी यांच्या ‘चिल्ड्रन्स ऑफ हेवन’ या सिनेमाची राहून राहून आठवण येते.
नाव सोहळा असला तरीही तितकाच साधेपणा आणि आशयघन आणि जगण्याला अर्थ देणारी अशी कथा यामुळे सोहळा आपल्या मनात घर करतो.
आपण आयुष्य आपल्यासाठी प्लॅन करत असतो पण नियतीच्या मनात त्याचा वेगळा आराखडा तयार असतो नेमकी अशीच काहीशी गोष्ट आहे शेतकरी कुटुंबात वाढणाऱ्या पशाची…
बाबा म्हणजे अल्लाउद्दीन चा दिवा… त्याकडे कोणतीही गोष्ट मागा हट्ट करा लाड पुरवून घ्या… आपला सुपरमॅन आपल्यासाठी अशक्य काय गोष्टही शक्य करू शकतो याची पूर्ण खात्री प्रत्येक मुलाला असते …
हुशार हात असणाऱ्या सुडकोली गावात एक प्रथा आहे… मुलगा वयात आला त्याचा सगळ्या गावासमोर सोहळा केला जातो ज्यात तो चिमुरडा सदरा घालून गावासमोर मिरवतो आणि बाबांच्या पायातल्या चपला या त्याने पायात घालून त्यात सोहळ्याची पूर्तता करायची असते. ही पूर्वपार चालत आलेली परंपरा…
या परंपरेच्या भोवती हे कथानक फिरते.
या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत…
बालपणातून पौगंडावस्थेकडे होणारा प्रवास, मित्रांसोबतच्या निरागस आठवणी आणि आयुष्याकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन… या सगळ्यांचा एकत्रित अनुभव म्हणजे ‘सोहळा’!
सैकत बागबान दिग्दर्शित हा मराठी चित्रपट एका तेरा वर्षांच्या पश्याच्या भावविश्वातून प्रेक्षकांना एका वेगळ्या प्रवासावर घेऊन जातो. पश्यासाठी त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘सोहळा’. नवीन कपडे, मिठाई, कुटुंबीयांचा सहवास, मित्रांची साथ आणि वडिलांच्या चपला पहिल्यांदा घालण्याची उत्सुकता… या सगळ्यांतून एका पारंपरिक संस्काराचे महत्त्व उलगडते. काही अनपेक्षित घटना माणसाला वयापेक्षा लवकर समजूतदार बनवतात. पश्याचा प्रवास याच भावनिक वळणांमधून पुढे सरकतो.
कथा आणि पटकथा : जमेची बाजू!
‘सोहळा’ची सर्वांत महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे त्याची कथा आणि पटकथा. बालपणातील निरागसता, कुटुंबातील नात्यांचे बंध आणि वाढत्या वयासोबत मनात निर्माण होणारे प्रश्न या गोष्टी कथेत सहजपणे गुंफल्या आहेत. त्यामुळे चित्रपट केवळ एका संस्कारापुरता मर्यादित राहत नाही, तर मुलांच्या भावविश्वाकडे पाहण्याची संधी देतो.
पटकथेत प्रसंगांची मांडणी आणि भावनिक घटनांची गुंफण कथेला पुढे घेऊन जाते. एखादी गोष्ट मोठ्या संवादांतून समजावून सांगण्यापेक्षा प्रसंगांमधून व्यक्त करण्याची पद्धत चित्रपटाच्या आशयाला अधिक परिणामकारक बनवते. त्यामुळे कथेशी जोडून घेणे सोपे जाते.
अभिनय : सहजतेतून उमटणारा परिणाम
पश्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या देवदत्त प्रशांत गोणे याच्यासह बालकलाकारांचा सहभाग चित्रपटाच्या भावविश्वासाठी महत्त्वाचा ठरतो. बालपणीच्या उत्सुकता, भावनिक गुंतागुंत आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न या गोष्टी साकारताना सहजता आवश्यक असते. प्रविण डाळिंबकर याने त्याचे काम चोख केले आहे त्याने साकारलेल्या बाबा हा काळजात घर करून जातो त्याची आणि मुलाची रिलेशनशिप आणि त्याची बायको आणि मुलीशी असलेला नातं हे अधिक गहिरे करूनजातं …
वर्षा मालवडकर यांनी साकारलेली आई तितकीच अस्सल खरीखुरी वाटते तिच्या डोळ्यातील दुःख आणि वेदना दाखवण्यात ते कुठेही कमी पडत नाहीत… तर वैष्णवी घोडके तिने साकारलेली गौराक्का सिनेमात अधिक रंग भरते… तिच्या डोळ्यातील स्वप्न परिस्थिती समजून घेऊन तिने साकारलेली बहीण आपला ठसा उमटवते. इतर कलाकार कथेला आवश्यक असलेली साथ देतात. चित्रपटाच्या भावनिक परिणामात कलाकारांच्या अभिनयाइतकेच प्रसंगांची मांडणी आणि त्यांना मिळालेली दृश्यात्मक आणि संवादाची साथ महत्त्वाची आहे. आसूडाचा फटका आणि भुकेचा चटका यासारखे संवाद आणि त्या भोवती गुंफण्यात आलेले सीन वेगळा परिणाम साधतात…
छायांकन : कथेला लाभलेले दृश्यसौंदर्य
छायाचित्रण हा ‘सोहळा’चा आणखी एक ठळक गुणविशेष आहे. छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळणारे विशाल बावा यांनी दृश्यांच्या माध्यमातून कथेला पूरक ठरणारे वातावरण निर्माण केले आहे. चित्रपटातील प्रसंगांना आवश्यक असलेली दृश्यात्मकता आणि भावनिक सूर यांची सांगड घालण्यात छायांकन महत्त्वाची भूमिका बजावते. विशेषतः शेतातील बाप मुलाच्या सावलीचा सिक्वेन्स हा मनात घर करून राहतो…
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद यांचा परस्परांशी असलेला मेळ विशेष उल्लेखनीय आहे. दृश्ये केवळ पडद्यावर घडणाऱ्या घटनांचे चित्रण करत नाहीत, तर कथेतल्या भावनांना अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यास मदत करतात. त्यामुळे फिल्म चा अनुभव अधिक सघन होतो…
संगीत आणि पार्श्वसंगीत
राहुल सुहास आणि अमेय शिलधनकर यांचे संगीत, तर मोहित कुलकर्णी यांचं पार्श्वसंगीत चित्रपटाच्या भावनिक विश्वाला पूरक ठरते. नंदेश उमप आणि राहुल सुहास यांच्या गायनासह मंदार चोळकर आणि राहुल सुहास यांच्या गीतलेखनाचे योगदान मोलाच आहे
कथेचा भावनिक सूर टिकवून ठेवण्यासाठी संगीत आणि ध्वनिरचना यांचे योगदान महत्त्वाचे असते. आशुतोष बल्सेकर यांचे ध्वनिमुद्रण आणि ध्वनिरचना या तांत्रिक बाजूला आकार देतात.
दिग्दर्शन : साध्या गोष्टींतील मोठा अर्थ
सैकत बागबान यांनी कथा आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. बालपण आणि मोठे होण्याच्या प्रक्रियेकडे पाहताना केवळ घटनांना महत्त्व न देता त्या घटनांचा मुलांच्या मनावर होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक असते. ‘सोहळा’ची संकल्पना याच भावनिक पातळीवर प्रेक्षकांशी संवाद साधते.
या विषयावर बोट ठेवताना हा नाजूक विषय तितकाच संवेदनशीलतेने हाताळला आहे ही त्याची जमेची बाजू.
चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या विषयातील सांस्कृतिक संदर्भ आणि कौटुंबिक भावविश्व यांची सांगड ही एक्झिन्सी वाटते आणि त्यामुळेच नेमका अपेक्षित परिणाम साधना दिग्दर्शक यशस्वी ठरतो…
कुठलाही अनपेक्षित ट्विस्ट, भास्कर विनोद आणि तद्दन कमर्शिअल समीकरणे नसताना साधा सरळ हृदयस्पर्शी असा हा सोहळा आहे. या सिनेमाला मी देतोय चार स्टार्स.
१. हा सिनेमा का पाहावा?
निरागसता, नाती, मूल्य, संस्कार आणि वाढत्या वयासोबत होणारे भावनिक बदल यांचा अनुभव घेण्यासाठी हा सोहळा पाहावा.
२. हा सिनेमा का टाळावा?
वेगवान कथानक, सततचे नाट्यमय ट्विस्ट आणि व्यावसायिक मनोरंजनाची अपेक्षा असले तर
३. थोडक्यात काय?
‘सोहळा’ हा बालपण, संस्कार आणि नात्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारा चित्रपट आहे. उत्तमकथा, पटकथा आणि सादरीकरण बाजू त्याच्या अनुभवाला अधिक समृद्ध करते.
थोडीक्यात काय : ‘सोहळा’ — बालपणाच्या आठवणींना आणि नात्यांच्या हळव्या बंधांना उजाळा देणारा चित्रपट!
चित्रपट : सोहळा (Sohla)
प्रस्तुतकर्त्या : सोनाली बेंद्रे
निर्मिती : गोल्डी बहल, रत्ना श्रीवास्तव, सचिन श्रीवास्तव आणि कविता बागबान
दिग्दर्शक : सैकत बागबान
सिनेमॅटोग्राफर : विशाल बावा
संगीत : राहुल सुहास अमेय शिलधनकर
कलाकार : प्रविण डाळिंबकर, देवदत्त प्रशांत गोणे, वर्षा मालवडकर, वैष्णवी घोडके, अलेसांद्रा व्हेलन मेरेडिझ आणि इतर बालकलाकार.तजय
कलाकार : प्रविण डाळिंबकर, देवदत्त गोणे, वर्षा मालवडकर, वैष्णवी घोडके, अलेसांद्रा व्हेलन मेरेडिझ आणि इतर बालकलाकार.
⭐⭐⭐⭐
