‘फुलवरा’च्या नायिकांची हुतात्मा स्मारकाला भेट! वैदेही-प्रियदर्शिनीने घेतली महाराष्ट्राच्या अस्मितेला मानवंदना
‘फुलवरा’च्या निमित्ताने वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देत हुतात्म्यांना अभिवादन केले.
Phulwara Movie : झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरमधून अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांचा लावणीसाज समोर आला असून, त्यांच्या पारंपरिक लावणीच्या रूपाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. नजाकतदार अदाकारी, पारंपरिक वेशभूषा आणि लावणीचा खास ठसका यामुळे दोघींच्या या नव्या भूमिकांविषयी उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या पहिल्या लूकनंतर वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट देत हुतात्म्यांना अभिवादन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे हे स्मारक महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते. या ऐतिहासिक स्थळाला भेट देत दोन्ही अभिनेत्रीांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला मानवंदना दिली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांसारख्या शाहिरांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती करत मराठी अस्मितेचा आवाज बुलंद केला होता. या चळवळीत लोककलेनेही महत्त्वाची भूमिका बजावली असून, लावणी, तमाशा आणि लोकनाट्य या कलाप्रकारांनी मराठी संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवला आहे. त्यामुळे ‘फुलवरा’मधील लावणीच्या विश्वाशी हुतात्मा स्मारकाच्या ऐतिहासिक आठवणींचा जोडलेला हा सांस्कृतिक संदर्भ विशेष लक्षवेधी ठरत आहे.
‘फुलवरा’ या चित्रपटातून लावणीच्या रंगतदार विश्वासोबतच या कलेमागील संघर्ष आणि कलावंतांचा प्रवासही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार, तसेच चित्रपटाची नेमकी कथा काय असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. हा चित्रपट 14 जानेवारी 2027 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.