Jacqueline Fernandez : दोनशे कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक कारनामा उजेडात आला आहे. या सुकेशने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) हीला एका विदेशी क्रमांकावरून अनेक मेसेज केले. यातील एका मेसेजमध्ये कोर्टात येताना काळ्या रंगाचा सूट घालून यावं, अशी विनंतीही त्याने केली होती. या प्रकारानंतर जॅकलिनने कोर्टात धाव घेत तक्रार दिल्याची माहिती आहे. सुकेश आपल्याला धमकावत असल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं आहे. व्हॉट्सअपवर आलेल्या एकाही मेसेजला जॅकलिनने उत्तर दिलं नाही. यानंतर सुकेशने (Sukesh Chandrashekhar) ऑडिओ मेसेज पाठविल्याचेही समोर आले आहे.
Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसची कोर्टात धाव; 200 कोटींच्या प्रकरणात दिलासा मिळणार?
सुकेशने जॅकलिनला कोर्टात सुनावणीवेळी येताना ब्लॅक कलरचा सूट परिधान करून येण्याची विनंती केली होती. मात्र, जॅकलीनने ब्लॅक सूट घातला नाही. त्यामुळे सुकेश नाराज झाला आणि चिडलाही. रागाच्या भरात त्याने पुन्हा जॅकलीनला मेसेज पाठवले. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. जॅकलीनने या मेसजेसकडे दुर्लक्ष केल्यानंतर सुकेशने तिला कोर्टातून चॅटरुममधून मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. या मेसेजमधून तो तिला वारंवार आय लव्ह यू म्हणत होता. मात्र जॅकलीनने त्याच्या एकाही मेसेजला उत्तर दिले नाही.
काय आहे प्रकरण ?
सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप असून तो सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. जून 2020 ते मे 2021 पर्यंत सुकेशने तिच्याकडून 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आदिती सिंहने केला आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव जोडले गेले आहे कारण त्याने जॅकलिनला अनेक कोटींच्या भेटवस्तू दिल्या होत्या. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि सुकेश जॅकलिनला करोडोंच्या भेटवस्तू दिल्याचे आरोप लावण्यात आले आहे.
सुकेशने अभिनेत्रीला करोडो रुपयांचे दागिने, चार पर्शियन मांजरी आणि एक घोडा (57 कोटी रुपये) भेट दिला आहे. इतकेच नाही तर सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबाला अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्या आहेत, ज्यात दोन कारचाही समावेश आहे. एका कारची किंमत 1.89 कोटी रुपये आणि दुसऱ्याची 1.25 कोटी रुपये आहे.