The Heart-Touching Journey of ‘Mukkaam Post Pandharpur’ : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने एका नव्या आणि आशयघन नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, श्रद्धा, अध्यात्म आणि जीवनप्रवास यांचा वेध घेणारी ही कलाकृती असल्याची उत्सुकता पहिल्या पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे. ‘पंढरीची वाट संपत नाही… ती प्रत्येक पावलागणिक नव्याने सुरू होते.’ या आशयपूर्ण ओळींसह प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका प्रवाशाचा पंढरीच्या दिशेने सुरू असलेला प्रवास आणि विठ्ठलाच्या विराट रूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडते.
त्यामुळे हे नाटक केवळ पंढरपूरच्या वारीपुरते मर्यादित न राहाता, प्रत्येकाच्या अंतर्मनातील श्रद्धा, संघर्ष आणि आत्मशोधाचा प्रवास मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन अशुतोष पोपट जरे यांनी केले असून निर्मिती डॉ. उमेश आजगावकर,नितीन प्रकाश वैद्य, सचिन सुभाष अवस्थी, स्वाती दिवे मुखर्जी यांनी केली आहे. कथानक, सादरीकरण आणि भावविश्व यांचा सुरेख मेळ साधत हे नाटक प्रेक्षकांना एक वेगळा नाट्यअनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारी शाळा बंद करण्याऐवजी अधिक सक्षम करण्याची गरज; आमदार सत्यजीत तांबेंची भूमिका
दिग्दर्शक अशुतोष पोपट जरे म्हणाले, ”‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ ही पंढरीच्या वारीची कथा नसून प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात सुरू असलेल्या प्रवासाची गोष्ट आहे. श्रद्धा, नाती, संघर्ष आणि आत्मशोध यांचा वेध घेणारा हा अनुभव रंगभूमीवर साकारताना प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी कलाकृती सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” निर्माते सचिन अवस्थी म्हणाले, “मराठी रंगभूमीवर दर्जेदार आणि आशयपूर्ण कलाकृती सादर करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेला साजेशी कलाकृती सादर करण्याचा आमचा प्रयत्न असून ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक प्रेक्षकांना भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर जोडेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर घोषणा झालेल्या या नाटकाविषयी आता रंगप्रेमी आणि विठ्ठलभक्तांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली असून, ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
