‘The Maharashtra Files’ ready for release : सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि समाजातील दुर्बल घटकांच्या न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी मांडणारा आगामी मराठी चित्रपट ‘द महाराष्ट्र फाईल्स’ अखेर 12 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. शासन दरबारी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, व्यवस्थेतील अडथळे आणि वंचित समाजाच्या वेदना यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून वास्तवाचा आरसा ठरणार आहे. बंजारा समाजाच्या न्याय, हक्कांसाठी दाखविण्यात येणारी ही भारतातील पहिली फिल्म आहे.
मात्र या चित्रपटाचा प्रवास सोपा नव्हता. विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला आणि या काळात निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सेन्सॉर बोर्डाने केलेल्या विलंबामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबल. एक मराठी निर्माता म्हणून या विलंबाचा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याची भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेत निर्माते आणि चित्रपटातील कलाकार मंडळींनी या विलंबाबाबत आपली मतं मांडली. यावेळी निर्माते संजीव कुमार राठोड, क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते शालिनी राठोड, अभिनेते मंगेश देसाई यांची उपस्थिती होती.
गुन्हेगारी, विषारी दारू आणि आता रेव्ह पार्टी; पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत पुन्हा निर्माण झाले गंभीर प्रश्न
एकूणच या प्रकरणाबाबत बोलताना निर्माते संजीव कुमार राठोड म्हणाले, “हा चित्रपट समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्हालाही मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अडथळे आणि सेन्सॉर बोर्डाच्या विलंबाचा सामना करून अखेर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आहोत. सत्य मांडण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.”
या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि सामाजिक आशय यामुळे ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे. अनेक अडचणींवर मात करत आता हा चित्रपट 12 जून रोजी राज्यभर प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे संपूर्ण टीमचे लक्ष लागले आहे.
