मुंबई : मराठी रंगभूमीला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबईतील नेहरू सेंटरने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या मराठी नाटकांना मुंबईतील नामांकित सांस्कृतिक केंद्र असलेल्या नेहरू सेंटरमध्ये सादरीकरणाची संधी मिळावी, या उद्देशाने हा विशेष उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवारच्या नाट्यप्रयोगांसाठी मराठी नाट्यनिर्मात्यांना सवलतीच्या दरात नेहरू सेंटरचे नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद विशेष प्रयत्नांतून नेहरू सेंटर व्यवस्थापनाला बहुमोल सहकार्य करणार आहे. या उपक्रमामुळे मराठी रंगभूमीला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच मराठी नाटकांना अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. तसेच नव्या प्रेक्षकांना मराठी रंगभूमीकडे आकर्षित करण्यासही या उपक्रमाची मदत होणार आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू सेंटरचे कामकाज पाहणारे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन करीर यांनी यावेळी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
नेहरू सेंटरमध्ये आजवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह विविध भाषांतील सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग होत आले आहेत. हिंदी आणि गुजराती नाटकांचे प्रयोगही येथे नियमितपणे सादर होतात. मात्र, मराठी नाटकांनाही या प्रतिष्ठित व्यासपीठावर अधिकाधिक संधी मिळावी, अशी नेहरू सेंटर व्यवस्थापनाची इच्छा आहे. यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला पुढाकार घेण्याची विनंती करण्यात आली.
नितीन करीर म्हणाले, नेहरू सेंटर हे केवळ नाट्यप्रयोगांसाठी उपलब्ध करून देणारे ठिकाण न राहता एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. देशभरात उत्तम काम करणाऱ्या नाट्यसंस्था, कलाकार आणि नाट्यनिर्मात्यांना प्रोत्साहन देण्याची आमची भूमिका आहे. मराठी रंगभूमीवरील दर्जेदार व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना येथे सादरीकरणाची संधी मिळावी, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. ही केवळ सुरुवात असून, प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात त्याचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. या उपक्रमाची सुरुवात दर रविवारी दुपारी 3.30 वाजता मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यापासून झाली आहे.
सुरुवातीला केवळ रविवारी दुपारच्या प्रयोगांवर भर दिला जाणार आहे. या प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आठवड्यातील इतर दिवशीही नाटकांचे प्रयोग आयोजित करण्याचा विचार आहे. आगामी प्रयोगांचे वेळापत्रकही निश्चित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमांतर्गत ‘ही दोस्ती तुटायची नाही’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. आगामी रविवारच्या प्रयोगांचेही नियोजन झाले असून, आगामी काळात ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’, ‘भूमिका’, ‘जर तरची गोष्ट’, ‘काटकोन त्रिकोण’,.आमने सामने आणि ‘मराठी बाणा’ यांसारख्या नाटकांचे प्रयोग नेहरू सेंटरमध्ये रंगणार आहेत.
आगामी काळात प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आठवड्यातील इतर दिवशीही मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करण्याचा विचार आहे.मराठी नाट्यनिर्मात्यांसाठी रविवारचा दिवस हा नेहमीच महत्त्वाचा असतो. मात्र, या दिवशी नाट्यगृह उपलब्ध होणे अनेकदा कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन नेहरू सेंटर व्यवस्थापनाने मराठी नाट्यनिर्मात्यांसाठी नाट्यगृह सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमात व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचा समावेश असेल. केवळ लोकप्रिय व्यावसायिक नाटकांपुरते मर्यादित न राहता, आशयघन आणि वेगळे प्रयोग करणाऱ्या नाटकांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. मराठी नाट्यविश्वातील विविध संस्था, कलाकार आणि निर्माते यांना एकत्र आणून त्यांच्या कलाकृतींना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद करणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी मराठी नाटकांसाठी नेहरू सेंटरसारखे प्रतिष्ठित व्यासपीठ उपलब्ध होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “एक कलाकार आणि नाट्यनिर्माते म्हणून नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळणे किती महत्त्वाचे असते, याची मला जाणीव आहे. नेहरू सेंटरसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी मराठी नाटकांना संधी मिळणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
आमच्या नाटकांच्या प्रयोगांना मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे मराठी रंगभूमीनेही या संधीचे स्वागत करून दर्जेदार प्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. हे आव्हान दोन्ही बाजूंनी सांभाळण्याची गरज आहे.”नाट्यप्रयोगांबरोबरच नाट्यविषयक इतर उपक्रमांनाही या व्यासपीठावर स्थान मिळणार आहे. ‘आविष्कार’ संस्थेसोबत सहकार्य करून नाट्यवाचन, कार्यशाळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. तसेच इतर भारतीय भाषांमधील नाटकांचाही समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मराठी नाट्यचळवळीला चालना देण्याबरोबरच नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातही योगदान देण्याची नेहरू सेंटर व्यवस्थापनाची तयारी आहे. एनसीपीएच्या धर्तीवर निर्मिती क्षेत्रातही पुढाकार घेण्याचा विचार असून, देशभरात उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या दर्जेदार नाटकांना प्रोत्साहन देण्याचा मानस आहे. नाट्यगृह उपलब्ध करून देण्यापलीकडे जाऊन नाट्यनिर्मिती, नाट्यसंस्था आणि कलाकारांना आवश्यक सहकार्य करण्यावर भर दिला जाणार आहे.
यासाठी विविध नाट्यप्रयोग, महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. केवळ महोत्सवांपुरते मर्यादित न राहता वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना नाट्यसंस्कृतीशी जोडण्याचा विचार आहे. मराठी रंगभूमीला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा नेहरू सेंटर व्यवस्थापनाचा हा उपक्रम केवळ नाट्यप्रयोगांच्या संधीपुरता मर्यादित नाही, तर नाट्यनिर्माते, कलाकार, संस्था आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद, नाट्यसंस्थांचे सहकार्य आणि कलाकारांचा सहभाग मिळाल्यास या उपक्रमाचा विस्तार करून मराठी रंगभूमीला नवी दिशा मिळू शकते.
मराठी नाटकांना सन्मानाचे व्यासपीठ, निर्मात्यांना प्रयोगांसाठी अनुकूल संधी आणि प्रेक्षकांना दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी देण्याच्या दिशेने नेहरू सेंटरने टाकलेले हे पाऊल मराठी रंगभूमीसाठी निश्चितच आशादायी ठरणार आहे.
