बिग बींच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट! दोन संशयितांना अटक, अमिताभ बच्चन म्हणाले ‘बच गए’
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट रचला जात असल्याची गुप्त माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती.
Plot to open fire at Amitabh Bachchan’s bungalow uncovered : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने वेळीच कारवाई करत हा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याचा कट रचला जात असल्याची गुप्त माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान या कटाशी संबंधित दोन संशयितांची माहिती समोर आली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले.
भारतीय वैद्यकीय क्षेत्रात रचला इतिहास! AIIMS दिल्लीकडून आईच्या गर्भातच बाळाच्या मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया
या प्रकरणात दीपक सिंह ऊर्फ दीप आणि विकास ठाकूर ऊर्फ विक्की अशी संशयितांची नावे समोर आली आहेत. दीपक सिंह याला ठाण्यातून, तर 25 वर्षीय विकास ठाकूर याला दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आले आहे. विकास ठाकूर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी असल्याची माहिती आहे. गोळीबाराचा कट उधळल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर ‘बच गए’ असे ट्विट केले आहे. त्यांच्या या मोजक्या शब्दांतील पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.
अमिताभ बच्चन यांना लक्ष्य करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 1984 मधील शीखविरोधी दंगलींच्या संदर्भात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना लक्ष्य करण्याचा कट आखण्यात आला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात असल्याचे वृत्त आहे. मात्र, या संशयाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला? बहरीनमध्ये खळबळ, होर्मुझमध्ये दोन टँकरना आग
एकीकडे बॉम्बने बंगला उडवण्याच्या धमक्या आणि दुसरीकडे गोळीबाराचा कट उघड झाल्याने अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामागे कोणाचा हात आहे आणि आरोपींचा नेमका उद्देश काय होता, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.