इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला? बहरीनमध्ये खळबळ, होर्मुझमध्ये दोन टँकरना आग
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने शुक्रवारीही बहरीनमधील अमेरिकेच्या अर्ली वॉर्निंग रडारला लक्ष्य केल्याचा दावा केला होता.
Iran attacks a US military base? : मध्यपूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. तर बहरीनने इराणचे अनेक हवाई हल्ले आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडल्याचे म्हटले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने शुक्रवारीही बहरीनमधील अमेरिकेच्या अर्ली वॉर्निंग रडारला लक्ष्य केल्याचा दावा केला होता. मात्र, अमेरिकन सैन्याने त्यावेळी हा दावा फेटाळला होता.
इराणची वृत्तसंस्था फार्स न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या कथित शत्रुत्वपूर्ण कारवायांना प्रत्युत्तर म्हणून बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आला. तर इराणच्या सरकारी प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बहरीनमधील अल-रिफा हेलिकॉप्टर तळावरील अमेरिकेच्या हवाई संरक्षण रडारला लक्ष्य करण्यासाठी सहा ड्रोन पाठवण्यात आले. मात्र, या हल्ल्याला अमेरिका किंवा बहरीनने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबफ यांनी ‘ना युद्ध, ना शांतता’ अशा अनिश्चित परिस्थितीत राहण्यास इराण तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्याबाबत अनिश्चितता कायम असल्याने मध्यपूर्वेतील तणाव वाढताना दिसत आहे.
राज्यात थंडीची चाहूल अन् चक्रीवादळाचं सावट! 19 नोव्हेंबरला विदर्भात पाऊस, एल निनोमुळे थंडीही कमी?
दुसरीकडे, होर्मुझच्या सामुद्रधुनीत बारूदी सुरुंगाला धडकल्याने दोन तेल टँकरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. रिव्होल्युशनरी गार्डच्या नौदलाने समुद्रात पेरलेल्या सुरुंगामुळे हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, टँकरची नावे आणि नुकसानीबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे जागतिक तेल वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, येमेनच्या सरकारी सैन्याने बाब अल-मंदेब सामुद्रधुनीजवळील परिसरातून माघार घेण्याची घोषणा केली आहे. एडनमधील मुख्य लष्करी तळाच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सैन्याने सांगितले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, येमेनच्या सैन्याची ही माघार इराणसमर्थित हुती बंडखोरांविरोधात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
एकीकडे अमेरिकेच्या लष्करी तळावरील हल्ल्याचे दावे, दुसरीकडे तेल टँकरना आग आणि येमेनमधील सैन्याची माघार, यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या संघर्षाचा जागतिक तेल पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर काय परिणाम होणार, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.