Iran War : आठची डेडलाईन अन् अमेरिकेचं ‘डूम्सडे प्लेन’ इराणला पाषाण युगात धाडणार?

Iran War 'डूम्सडे प्लेन' हे केवळ एक विमान नसून ते हवेत तरंगणारे एक अभेद्य लष्करी केंद्र आहे, ज्याला 'फ्लाइंग पेंटागन' असेही संबोधले जाते.

  • Written By: Published:
Iran War : आठची डेडलाईन अन् अमेरिकेचं डूम्सडे प्लेन' इराणला पाषाण युगात धाडणार?

America Iran War What Is Doomsday Plane? & How Much Dangerous : इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धात आजचा दिवस संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा असणार आहे. कराण जर इराणसोबतच्या चर्चेत तोडगा निघाला नाही तर, रात्री 8 वाजता इराणला समूळ नष्ट करण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर अमेरिकेचं आण्विक युद्धासाठी वापरलं जाणारं ‘डूम्सडे प्लेन’ च्या नेब्रास्का हवाईतळावर घिरट्या सुरू असल्याचं दिसून आल्याचे सांगितलं जात आहे. हा तळ अमेरिकेच्या ओमाहा राज्यात आहे. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर अमेरिकेचं आण्विक युद्धासाठी वापरलं जाणारं ‘डूम्सडे प्लेन’ चर्चेत आलं आहे. नेमकं हे विमान काय? त्याची वैशिष्टे काय? त्याबद्दल जाणून घेऊया…

‘डूम्सडे प्लेन’ म्हणजे उडतं लष्करी केंद्रच

अमेरिकेचे ‘डूम्सडे प्लेन’ (Doomsday Plane) हे केवळ एक विमान नसून ते हवेत तरंगणारे एक अभेद्य लष्करी केंद्र आहे, ज्याला ‘फ्लाइंग पेंटागन’ किंवा ‘उडता किल्ला’ असेही संबोधले जाते. हे बोईंग कंपनीने तयार केलेलं E-4 बी नाईटवॉच जातीचं विशेष विमान आहे. अण्वस्त्र युद्ध किंवा भीषण राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात जेव्हा जमिनीवरील सर्व यंत्रणा कोलमडतात, तेव्हा याच विमानातून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष, संरक्षण सचिव आणि वरिष्ठ लष्करी कमांडर देशाचा कारभार आणि लष्करी मोहिमांचे संचालन करू शकतात. या विमानाची सर्वात मोठी ताकद म्हणजे हे परमाणु विस्फोटाची प्रचंड उष्णता आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सचा (EMP) झटका सहज पचवू शकते, ज्यामुळे यातील अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा कधीही निकामी होत नाही.

हवेत किती तास उडू शकतं?

हवेतील इंधन भरण्याच्या (Mid-air Refueling) क्षमतेमुळे ‘डूम्सडे प्लेन’ हे विमान सलग 35 तास आणि प्रसंगी 6 ते 7 दिवसांपर्यंत जमिनीवर न उतरता आकाशात राहू शकते. अत्याधुनिक संचार उपकरणांनी सज्ज असलेल्या या विमानातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संपर्क साधणे शक्य आहे.

काय आहे ‘डूम्सडे प्लेन’?

हे केवळ एक विमान नसून हवेत तरंगणारे एक ‘कमांड सेंटर’ आहे. बोइंग 747 विमानाला अत्याधुनिक बदल करून हे विमान तयार करण्यात आले आहे. अमेरिकेच्या हवाई दलाकडे अशी 4 विमाने असून, त्यापैकी किमान एक विमान 24 तास ‘अलर्ट मोड’वर असते.

विमानाची थक्क करणारी वैशिष्ट्ये

अण्वस्त्रांपासून संरक्षण : हे विमान अण्वस्त्रांच्या स्फोटातून निघणाऱ्या उष्णतेपासून आणि घातक रेडिएशनपासून सुरक्षित राहू शकते.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (EMP) शील्ड : अण्वस्त्र स्फोटामुळे होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटांमुळे सामान्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होतात. मात्र, या विमानातील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा ‘हार्डन’ केलेली असल्याने त्यावर कोणताही परिणाम होत नाही.

हवेतील महाससंवाद केंद्र : या विमानावर 67 सॅटेलाइट डिश आणि अँटेना आहेत. याद्वारे राष्ट्राध्यक्ष जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात, अगदी समुद्राखाली असलेल्या पाणबुड्या आणि जमिनीखालील मिसाईल सायलोसशी संपर्क साधू शकतात.

सलग 7 दिवस हवेत : इंधनाच्या पुनर्भरणाची सोय असल्याने हे विमान सलग एक आठवडा जमिनीवर न उतरता हवेत राहू शकते. याची रेंज 7 हजार मैलांपेक्षा जास्त आहे.

लष्करी ताफा : या विमानात 112 कर्मचारी आणि लष्करी रणनीतीकारांची टीम बसू शकते. यात कॉन्फरन्स रूम, ब्रीफिंग रूम आणि अत्याधुनिक कार्यशाळा आहेत.

देखरेखीचा खर्च डोळे पांढरे करणारा

जगभरात ‘डूम्सडे प्लेन’ या नावाने ओळखले जाणाऱ्या या विमानाचा देखरेखीचा खर्च डोळे पांढरे करणारा आहे. अशाप्रकारच्या एका विमानाची बांधणीची किंमत सुमारे 223.2 दशलक्ष डॉलर्स आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे विमान हवेत ठेवण्यासाठी प्रति तास अंदाजे 1,59,529 डॉलर्स (भारतीय रुपयांत 1 कोटीपेक्षा जास्त) खर्च येतो. जरी हे विमान अण्वस्त्र युद्धासाठी डिझाइन केलेले असले, तरी मोठ्या नैसर्गिक आपत्ती किंवा सायबर हल्ल्यांच्या वेळी जेव्हा जमिनीवरील दळणवळण यंत्रणा कोलमडते, तेव्हा हे विमान सरकार चालवण्यासाठी मुख्य केंद्र बनू शकते. केवळ अमेरिकाच नाही, तर रशियाकडेही अशाच प्रकारचे ‘डूम्सडे प्लेन’ आहे. त्यामुळे आता इराण अमेरिकोसोबत युद्धबंदीसाठी तयार होतो की, ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे ‘डूम्सडे प्लेन’ च्या हल्ल्यानंतर पाषाण युगात जातो हे पुढील काही तासात स्पष्ट होईल.

follow us