445 मिलियन डॉलर बुडाले, ट्रम्पही हरले; आता मस्क यांच्या मानगुटावर चौकशीचा ससेमिरा

Donald Trump निवडणुकीत ट्रम्प हरले असले, तरी सर्वात मोठा झटका बसलाय जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांना. 

  • Ninad K
  • Written By: Published:
Donald Trump elon musk

USA Midturm Election Donald Trump : अमेरिकन मिडटर्म निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. डेमोक्रॅट्सनी अमेरिकेच्या संसदेच्या दोन्ही सदनांवर, म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेटवर ताबा मिळवला आहे. पण या निवडणुकीत ट्रम्प हरले असले, तरी सर्वात मोठा झटका बसलाय जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांना.  मस्क यांनी रिपब्लिकन उमेदवारांना जिंकवायचे म्हणून थोडा थोडका नव्हे तर, तब्बल 445 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 4,000 कोटी रुपये खर्च केले होते. एवढं करूनही बहुतांश उमेदवार पराभूत झाले. आता प्रश्न हा आहे की, मस्क यांचे हे पैसे तर बुडालेच, पण आता त्यांच्यावर चौकशीची तलवार लटकत आहे? नेमका हा सगळा प्रकार काय? त्याबद्दल जाणून घेऊया…

सर्वात मोठा धक्का बसला टेक्सास राज्यातून

टेक्सास हे मस्कच्या व्यावसायिक साम्राज्याचे मुख्य केंद्र आहे. टेस्ला, स्पेसएक्स आणि X यांसारख्या कंपन्यांचे मुख्यालये तिथेच आहेत. मस्क यांनी टेक्सासमध्ये तब्बल 20 कोटी डॉलरपेक्षा जास्त खर्च केले. सिनेट निवडणुकीत त्यांनी केन पाॅक्सटन यांचे समर्थन केले होते, पण डेमोक्रॅटिक उमेदवार जेम्स टालारिको यांनी पाॅक्सटन यांचा धुव्वा उडवला. USA Midturm Election Donald Trump

नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, एलन मस्क यंदाच्या मिडटर्म निवडणुकीतील सर्वात मोठे वैयक्तिक देणगीदार ठरले. त्यांनी सुपर PAC आणि विविध राजकीय संघटनांना 44.5 कोटी डॉलर दिले. एवढेच नाही, तर आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून सलग पोस्ट करून आपल्या 24 कोटींहून अधिक फॉलोअर्सना रिपब्लिकन पक्षाला मत देण्याचे आवाहन केले होते.

आता खरी अडचण निवडणुकीत पैसे बुडाल्याची नाही, तर त्यानंतर सुरू होणाऱ्या चौकशांची आहे. ट्रम्प प्रशासनात मस्क यांनी ‘DOGE’ म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे नेतृत्व केले होते. या चार महिन्यांच्या काळात सरकारी खर्च कमी करण्याच्या नावाखाली अनेक कर्मचाऱ्यांची कपात केली गेली. आता डेमोक्रॅट्सचा संसदेत वरचष्मा वाढल्यामुळे ते हाच सवाल करत आहेत की, ‘मस्क यांनी या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या कंपन्यांना फायदा तर पोहोचवला नाही ना? विशेष म्हणजे, मस्क ज्या चार महिने DOGE चे प्रमुख होते, त्याच काळात त्यांच्या कंपन्यांना 6.3 अब्ज डॉलरचे सरकारी ठेके मिळाले आणि त्यानंतर आणखी कमीत कमी 10 अब्ज डॉलरची कंत्राटे मिळाली. मस्क हे ‘विशेष सरकारी कर्मचारी’ म्हणून काम करत होते. अशा कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आर्थिक हिताशी जोडलेल्या सरकारी निर्णयांमध्ये सहभागी होण्यास फेडरल कायदा मनाई करतो. जर मस्क यांनी यामध्ये नियम मोडले असतील, तर ते कायदेशीर अडचणीत येऊ शकतात असे मत व्हाइट हाउसचे माजी एथिक्स वकील रिचर्ड पेंटर यांनी व्यक्त केले आहे.

रशिया कनेक्शन आणि स्टारलिंकवर प्रश्नचिन्ह

फक्त अंतर्गत राजकारणच नाही, तर मस्कचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संबंधही आता तपासाच्या फेऱ्यात अडकले आहेत. कारण,  डेमोक्रॅटिक सिनेटर क्रिस कून्स यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मस्क यांच्या कथित संपर्कांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे गरज पडल्यास मस्क यांना संसदीय चौकशीसाठी समन्स पाठवले जाऊ शकते.

तर, दुसरीकडे खासदार माइक लेविन यांनी युक्रेनमध्ये मस्क यांच्या ‘स्टारलिंक’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मस्क यांनी युक्रेनच्या सैन्याला मिळणाऱ्या स्टारलिंक वापरावर काही निर्बंध लादले होते. अमेरिकेच्या एका सहयोगी देशाच्या सैन्य संवादावर एका खाजगी व्यावसायिकाचा एवढा प्रभाव कसा असू शकतो, असा सवाल डेमोक्रॅट्सकडून आता विचारला जात आहे.

ट्रम्प परभूत होताच शेअर्समध्ये घसरण

अमेरिकेतील या राजकीय घडामोडींचा थेट परिणाम मस्कच्या कंपन्यांवरही दिसून येत आहे. निवडणुकांच्या निकालानंतर टेस्लाचे शेअर्स 3% आणि स्पेसएक्सचे शेअर्स जवळपास 4% घसरले. त्यामुळे एका बाजूला अफाट संपत्ती आणि तंत्रज्ञानाची बादशहा, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात वावरणारे एलन मस्क आता अशा वळणावर उभे राहिले आहेत जिथे त्यांच्या पुढील प्रत्येक पावलावर राजकारण आणि कायद्याची कठोर नजर असणार आहे. त्यात आता डेमोक्रॅट्सकडे संसदेचे दोन्ही सदन असल्याने, ‘DOGE’ मधील निर्णयांची चौकशी, रशियासोबतचे कथित संबंध आणि स्टारलिंकचे कंत्राट या मुद्द्यांवर मस्क यांना काटेकोर उत्तरे द्यावी लागतील. त्यामुळे संपत्ती आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या मस्क यांच्यासाठी पुढचा काळ खूप कसोटीचा असणार आहे.

follow us